धक्कादायक; सोलापुरातील शासकीय रूग्णालयात खाली बेड टाकून रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:11 PM2021-04-09T13:11:39+5:302021-04-09T13:11:45+5:30
कोरोनामुळे हॉस्पिटल फुल्ल : कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची कसरत
सोलापूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपचारासाठी बेड मिळविणे मुश्किल झाले आहे. सिव्हिल हॉस्पिटल तुडुंब झाल्याने तिथेही जागा नाही. मात्र, रुग्ण येत असल्याने खाली बेड टाकून उपचार करण्याची वेळ सिव्हिल हॉस्पिटलवर आली आहे.
कोरोना झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्यक्ष जाऊन खासगी रुग्णालयात बेड आहे की नाही याची चौकशी करावी लागत आहे. या परिस्थितीत खासगी रुग्णालयात बेड नसल्याने निराशा हाती लागत आहे. यातच सिव्हिल हॉस्पिटलमध्येही कोरोनाचे सर्व बेड तुडुंब झाले आहेत. १२० क्षमता असलेला ए ब्लॉकमध्ये बेड जवळ-जवळ १९० बेड तयार करण्यात आले आहेत. तरीही हे बेड कमी पडत आहेत.
सिव्हिलमध्ये आल्यानंतर तिथेही बेड शिल्लक नाहीत. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी खाली बेड टाकून रुग्णांवर उपचाराची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळत आहे. एखादा रुग्ण बरा होऊन गेला की त्याच्या जागी आपणाला बेड मिळेल, या अपेक्षेने रुग्ण सिव्हिलमध्ये खाली बेड टाकूनही उपचार घेण्यास तयार होत आहे.
अनेक रुग्णालयात बेडसाठी चौकशी केली. मात्र, कुठेच बेड मिळाला नाही. सगळीकडे नकार मिळत असल्याने आम्ही निराश झालो होतो. सिव्हिलमध्येही बेड शिल्लक नाहीत. तरीही येथील डॉक्टरांनी खाली बेड टाकून उपचार करण्याची तयारी दर्शविली आहे. एखादा रुग्ण बरा होऊन गेला की बेड मिळेल अशी अपेक्षा आहे.
- रुग्णाचे नातेवाईक