धक्कादायक; मंगळवेढा तालुक्यात विषबाधेने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:21 PM2021-12-24T17:21:36+5:302021-12-24T17:21:41+5:30
मंगळवेढा : मरवडे (ता. मंगळवेढा) येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्या बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भक्ती आबासाहेब ...
मंगळवेढा : मरवडे (ता. मंगळवेढा) येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्या बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय- 06) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय-04) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने मरवडे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लाडक्या लेकीसाठी मंगळवार दि.21 रोजी मंगळवेढा येथील दुकानातून खाऊ आणला होता. हा खाऊ खाल्यानंतर चव्हाण कुटूंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. उपचारादरम्यान गुरुवार (दि.23) रोजी पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू मंगळवेढा येथील खाजगी दवाखान्यात झाला तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी मध्यरात्री पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला. भक्ती ही मरवडे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती. नम्रता ही बालवाडीत शिकत होती. भक्ती व नम्रता यांच्या गोड स्वभाव व हुशारीमुळे त्या सर्वांच्यात लाडक्या होत्या.
भक्ती व नम्रता यांच्यावर मरवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटूंबातील दोघी बहिणींचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याने मरवडेत खळबळ उडाली असून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत. या घटनेचा मंगळवेढा पोलीस ठाण्याकडून तपास केला जात आहे.