धक्कादायक! खारघर येथील घटनेत सोलापुरातील दोन श्री सदस्य महिलांचा मृत्यू
By Appasaheb.patil | Published: April 17, 2023 01:17 PM2023-04-17T13:17:40+5:302023-04-17T13:18:11+5:30
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला.
सोलापूर : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील ११ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन महिला श्री सदस्यांचा समावेश असल्याचे समाेर आले आहे.
कलावती सिद्राम वायचळ (वय ४५, तोडकर वस्ती, बाळे, सोलापूर) व संगीता संजय पवार (गाव – मंगळवेढा, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या दोन महिला श्री सदस्यांची नावे आहेत. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, खारघर येथील कार्यक्रमासाठी सोलापुरातील लाखाे श्री सदस्य गेले शनिवारी सायंकाळी उशिराने मुंबईकडे रवाना झाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास ते खारघर येथे पोहोचले.
दुपारी कार्यक्रम झाल्यानंतर परतीच्या मार्गावर असताना कलावती वायचळ व संगीता पवार या दोघींना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे श्री सदस्यांनी तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दुदैवाने सोमवारी पहाटेच्या सुमारास दोघींचा मृत्यू झाल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगितले. दोघीं महिलांचे मृतदेह त्यांच्या त्यांच्या मुळगावी आणण्यात आले असून पाच नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.