धक्कादायक; पैशांच्या कारणावरून चौघांनी केलेल्या मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 04:46 PM2022-04-29T16:46:30+5:302022-04-29T16:46:35+5:30
सोलापुरातील घटना; तिघांविरोधात गुन्हा दाखल
सोलापूर : पैशांच्या कारणावरून झालेल्या वादावादीत महिलेला तीन जणांनी मिळून मारहाण केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विनायक अशोक काळे (वय ३२, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी एक, पारधी कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी २६ एप्रिल रोजी घडली.
विनायक काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पैशांच्या कारणावरून आरोपी गव्हर्नर दगडू काळे, दत्ता विठ्ठल चव्हाण, किसन विठ्ठल चव्हाण (सर्व रा. सेटलमेंट फ्री, कॉलनी एक) यांनी फिर्यादी काळे यांच्या आईला व वहिनीला शिवीगाळ केल्याप्रकरणी ते विचारण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी फिर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी विनायकची आई मयत यशोदा अशोक काळे ऊर्फ यशोदा राम चव्हाण व वहिनी सविता काळे हे भांडण सोडवण्यासाठी आले. त्यावेळी आरोपी किसन चव्हाण याने फिर्यादीच्या आईला मानेवर बुक्की मारली व आरोपी गव्हर्नर काळे याने फिर्यादीच्या आईला पाठीवर लाथ मारली. त्यामुळे त्यांच्याही गुडघ्यावर पडल्या व दत्ताने त्यांना ढकलले. त्यामुळे यशोदा या बेशुद्ध झाल्या.
यामुळे यशोदा काळे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी विनायक काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गव्हर्नर काळे, दत्ता चव्हाण, किसन चव्हाण यांच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई सचिन मंदृपकर करत आहेत.