धक्कादायक; महिला वकिलाची सोलापुरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:11 PM2020-07-02T12:11:45+5:302020-07-02T12:13:45+5:30
जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठेतील घटना; महिला वकिलाच्या मृत्यूने सोलापुरात खळबळ
सोलापूर : जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून महिला वकिलाने पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला.
अॅड. स्मिता धनंजय पवार (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या महिला वकिलाचे नाव आहे. मंगळवेढा येथील विठ्ठल गोवे यांची कन्या अॅड. स्मिता यांचा विवाह सोलापूर येथील धनंजय पवार यांच्यासमवेत ६ मे २०१८ रोजी झाला होता. त्या सोलापूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्या.
बुधवार दि. १ जुलै रोजी दुपारी पावणेतीन वाजण्यापूर्वी सोलापुरातील जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ येथील राहत्या घरी, पहिल्या मजल्याच्या बेडरुममध्ये गेल्या. काही वेळानंतर अज्ञात कारणावरून नारंगी रंगाच्या साडीने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्या. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याची खबर डॉ.अनिकेत मानेकर यांनी पोलिसात दिली असून, अधिक तपास हवालदार काझी हे करीत आहेत.