धक्कादायक; ११ वर्षे मधुमेहाला झुंज देणाऱ्या तरुणाला अखेर मृत्यूने गाठले
By Appasaheb.patil | Published: June 18, 2021 01:32 PM2021-06-18T13:32:46+5:302021-06-18T13:33:01+5:30
सचिन पांढरेचा अकाली मृत्यू - हजारो श्रध्दांजलीच्या पोस्ट सोशल मीडियावर झाल्या होत्या व्हायरल
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : एक नव्हे तब्बल अकरा वर्षे मधुमेह आजाराला झुंज देणारा हिंदवी परिवाराचा सदस्य सचिन सुरेश पांढरे याला अखेर मृत्यूने गुरुवारी गाठले. अवघ्या ३६व्या वर्षी झालेल्या सचिनच्या अकाली निधनाने सोलापुरातील त्याच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. गुरुवारी दिवसभर हिंदवी परिवारातील प्रत्येक सदस्य व शहरातील त्याच्या मित्राच्या फेसबुक, व्हॉट्सअप स्टेट्सला व इतर सोशल मीडियावर सचिनच्या श्रध्दांजलीबाबतच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या.
लिमयेवाडीतील राहणाऱ्या सचिनचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासून बोलका, आत्मविश्वासू, सखोल ज्ञान असणारा, मदतीला धावून येणारा सचिन मित्र परिवारात सर्वांचा लाडका होता. सचिनचे प्राथमिक शिक्षण आण्णासाहेब पाटील प्रशाला तर माध्यमिक शिक्षण कुचन प्रशाला तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी आयडियल सोल्युशनच्या माध्यमातून विविध सॉफ्टवेअर्स, नेटवर्किंगची त्यांनी कामे सुरू केली होती. सुरुवातीला लोकमंगल उद्योग समूहात त्यांनी आयटी विभाग पाहिला. त्यानंतर हळूहळू इतर उद्योग, व्यवसाय करण्यास त्यांनी सुरुवात केली. विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्याचा त्याचा छंद होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सचिनवर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पर्यावरण... ध्यान अन् योगा...
राष्ट्र प्रथम, वंदे मातरम् आणि पर्यावरण वाचवा... जीवन वाचवा या मंत्राबरोबरच ध्यान आणि योगांच्या माध्यमातून सचिन यांची सकाळ उगवत होती. सचिन हा लोकमंगल, सोलापूर जनता बँक, हिंदवी परिवार, राष्ट्रीय सेवा संघ, इको फ्रेंडली क्लब, निसर्ग माझा सखा अशा विविध ग्रुपशी कनेक्ट होता.
बेंगलोर, हैदराबाद, पुण्यातही घेतले उपचार
सचिनला सुरुवातीला मधुमेह (शुगर) झाली. त्यानंतर मधुमेह वाढल्याने त्याच्या डोळ्याला इजा झाली. कालांतराने एक डोळा निकामी झाला होता, दुसऱ्या डोळ्याला ४० टक्के दिसत होते. दुर्धंर आजारामुळे सचिनला बेंगलोर, हैदराबाद, पुणे, मुंबई यासह अन्य मोठमोठ्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. आयुर्वेदिक, ॲलोपॅथीसह अन्य विविध निसर्गोपचार पध्दतीनेही त्याच्यावर उपचार करण्यात आले होते, मात्र गुरुवारी त्याच्या निधनाने ते सर्व उपचार बिनकामी ठरल्याचे दिसून आले.
ट्रेकिंग, हिवाळी मोहिमातही होता सहभाग
सचिनला किल्ला दर्शन, हिवाळी मोहिमा तसेच गडकिल्ले, डोंगरकड्यांवर ट्रेकिंगची आवड होती. सचिनने आतापर्यंत पन्हाळा पावनखिंडीसह पाच ते सहा मोहिमा पूर्ण केल्या होत्या. मात्र मध्यंतरी आजारी असल्याने हिंदवी परिवाराचे प्रमुख डॉ. शिवरत्न शेटे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ट्रेकिंग करणे थांबविले होते. त्याने कामानिमित्ताने दोन वेळा परदेश (चीन) दौरा केला होता.
दुर्धर आजार आहे, डायलिसिस करावे लागतेय, डोळ्याला दिसत नाही हे समजत असतानाही सकारात्मक विचारसरणी, आशावादी विचाराने त्याने जीवनात प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवले. हिंदवी परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने त्याचा सहभाग असायचा. त्याच्या निधनाने हिंदवी परिवाराचे नुकसान झाले.
- डॉ. शिवरत्न शेटे, संस्थापक अध्यक्ष, हिंदवी परिवार, सोलापूर