ग्रामीण भागातील दुकाने आता रात्री दहापर्यंत; उद्यापासून मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 10:52 AM2021-10-06T10:52:15+5:302021-10-06T10:52:28+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश :
सोलापूर : माळशिरस, करमाळा, सांगोला, पंढरपूर तसेच माढ्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील व्यापारी दुकाने गुरुवार, ७ ऑक्टोबरपासून रात्री दहापर्यंत सुरू राहतील. यासोबत कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थना स्थळेही सुरू राहतील. रोज किती भक्त दर्शन घेतील, याबाबत मंदिर समितीने निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दिले आहेत.
वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर, माळशिरस, करमाळा, सांगोला तसेच माढा तालुक्यात दुपार चारपर्यंत जमावबंदी तसेच सायंकाळी पाच नंतर संचारबंदी होती. ही संचारबंदी गुरुवारपासून उठवण्यात आली असून, आता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल्स रात्री दहापर्यंत सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे.
दुकानांबरोबरच हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू राहतील. एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांची सवलत दिली आहे. पन्नास टक्के क्षमतेने सलून, क्रीडांगणे व व्यायामशाळांना सूट दिली आहे. मंगल कार्यालये व सभागृहे ५० टक्केच्या क्षमतेने सुरू राहतील. बंदिस्त सभागृहातील लग्न समारंभाला १०० जणांना तसेच खुल्या लॉनमधील विवाह सोहळ्यास दोनशे जणांना उपस्थित राहता येईल. नवीन आदेशामुळे ग्रामीण भागातील व्यापारी व दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिनेमागृहे आणि थिएटर्संना अद्याप सुट देण्यात आलेली नाही. मॉल्स रात्री दहापर्यंत सुरू राहतील. अठरा वर्षातील मुलांना मॉलमध्ये जाताना वयाचा दाखला किंवा आधारकार्ड सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आला आहे.
ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले आहे, अशा परराज्यातील प्रवाशांना सोलापुरात येताना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नसेल; परंतु ७२ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील, असे आदेशात म्हटले आहे.
मंदिरांसाठी नियमावली
- सैनिटायझर, मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग बंधनकारक
- प्रतिबंधित क्षेत्रातील मंदिरे बंद राहतील
- मंदिरातील पुतळे, मूर्ती तसेच पवित्र ग्रंथास स्पर्श करू नका
- मंदिर परिसरात मेळावे, संमेलनांना बंदी
- प्रसाद तसेच तीर्थ वाटपाला बंदी
- तीर्थही शिंपडता येणार नाही
- भक्तीगीते वगळता समूहगीते गाण्यास बंदी
- आजारी व्यक्तींसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था असावी
- पादत्राणे स्वत:च्या वाहनात ठेवा
- एकाच चटईवर एकाने प्रार्थना करावी