सोलापुरातील दुकानं बंद... पत्त्यांचा खेळ मात्र सुरू; दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 04:21 PM2021-08-03T16:21:24+5:302021-08-03T16:21:32+5:30

नवीपेठेत कारवाई : ‘अंदर-बाहर’च्या खेळात ‘अंदर’

Shops in Solapur closed ... card game continues; Crimes filed against ten traders | सोलापुरातील दुकानं बंद... पत्त्यांचा खेळ मात्र सुरू; दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

सोलापुरातील दुकानं बंद... पत्त्यांचा खेळ मात्र सुरू; दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next

सोलापूर : शनिवारी आणि रविवारी दुकानं बंदच्या आदेशाने व्यापार ठप्प झाला. करायचं काय तर चला पत्त्यांचा खेळ रंगवू, असा विचार करून नवी पेठेतील एका ठिकाणी व्यापाऱ्यांनी बैठक बसवली. रविवारी सायंकाळी खेळ रंगत असताना नवी पेठेतील पंजाबी इमारतीत अचानक पोलिसांची धाड पडली. जुगार खेळणाऱ्या १० व्यापाऱ्यांना अटक केली. बदनामी होईल म्हणून व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमधील नोकरांची नावे घेण्यास सांगितले. मात्र, पोलिसांनी कारवाई करायची ती केलीच.

छापा मारून पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख ६२ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त केला. चंदन अविनाश पंजाबी (वय ३८, रा. १३ गोल्डफिंच पेठ), अरविंद संजय घोडके (वय ३०, रा. शक्ती पूजा देवी जम्मा चाळ, भवानी पेठ), अजित मुनीलाल बाफना (वय ३८, रा. अरिहंत अपार्टमेंट, सम्राट चौक), अनुप रमेश मंत्री (वय ३२, रा. वर्धमान नगर, भवानी पेठ), हर्षल राजेंद्र सारडा (वय ३१, रा. वर्धमाननगर), मकरंद बाळकृष्ण खरात (वय ४६, रा. रामलाल चौक), शांतीलाल छगनलाल कांकरीया (वय ५०, रा. हिरेहब्बु कॉम्प्लेक्स, बाळीवेस), करण अशोक कुकरेजा (वय २४, रा. लक्ष्मी विष्णू सोसायटी, कुमठा नाका), सम्राट प्रकाश माने (वय २४, रा. लक्ष्मी विष्णू सोसायटी, कुमठा नाका), रवी शंकर शिंगे (वय ३४, रा. शेटेवस्ती, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

नवी पेठेत एका दुकानाच्या वर असलेल्या घरात जुगार सुरू असल्याची माहिती फौजदा चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून नवी पेठेतील लाल बहादूर शास्त्री शॉपिंग सेंटरशेजारी असलेल्या पंजाबी इमारतीजवळ पाेलीस गेले. प्रवेशद्वाराला आतून कुलूप असल्याने बराच वेळ पोलीस दबा धरून बसले. काही वेळानंतर एक साथीदार स्नॅक्स घेण्यासाठी खाली आला, तो कुलूप काढून बाहेर येताच पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस साथीदाराला घेऊन वर गेले. त्याने बाहेरून आवाज दिला. आतील व्यक्तीने दार उघडताच पोलीस आत घुसले. पोलिसांना दहा जण पत्त्यावर पैसे लावून ‘अंदर बाहर’ नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस नाईक धनाजी बाबर यांनी फिर्याद दिली आहे.

बदनामी होऊ नये म्हणून नोकरांची नावे

  • धाड पडताच “साहेब, आमची चूक झाली. आम्हाला माफ करा,” अशी गयावया व्यापारी करू लागले. सर्वांना नाव विचारत असताना काहींनी आपली ओळख होऊ नये म्हणून दुकानातील नोकरांची नावे सांगितली. मात्र, पोलिसांनी आधार कार्ड मागविल्याने नावांतील तफावत स्पष्ट झाली.
  • ० व्यापाऱ्यांना अटक केल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांना फोन येऊ लागले. “साहेब, कारवाई करू नका. आम्ही सीपी साहेबांशी बोलू का?” असे म्हणू लागले. मात्र पोलीस निरीक्षकांनी माझ्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा, असा दम प्रत्येकाला भरला.

Web Title: Shops in Solapur closed ... card game continues; Crimes filed against ten traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.