नकारात्मकता दूर ठेवायला सांगणारी अन् 'भान' जपायला लावणारी शॉर्ट फिल्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 03:53 PM2021-06-09T15:53:45+5:302021-06-09T22:34:13+5:30
'लोकमत' च्या बातम्यांचा वापर; रामचंद्र इकारे यांचे दिग्दर्शन
सोलापूर : कोरोनामुळे अनेक देश अडचणीत सापडले असून त्यांची प्रगती थांबली आहे. अनेकांचा मृत्यू या आजाराने होत आहे. पण, या आजारासोबतच कोरोनाच्या भीतीने माणसे दगावत आहेत. त्यामुळे नकारात्मक दृष्टी दूर ठेवण्याचे ' भान ' जपायला हवे ही सांगणारे ' भान ' ही शॉर्ट फिल्म अनेकांना सकारात्मकतेकडे घेऊन जात आहे.
जगभरात कोरोनामुळे नकारात्मकता पसरत असताना लोकमतने सकारात्मक वृत्ताला प्राधान्य दिले. कोरोना झाल्यानंतरही त्यातून कसे बाहेर पडता येते. दृढ इच्छाशक्तीचा कसा फायदा होतो. वयोवृद्धांनी कोरोनावर कशी मात केली, अख्ख्या गावाने एकत्र येऊन कोरोनाला कसे हद्दपार केले याबाबतचे वृत्त सतत ' लोकमत ' मध्ये प्रसारित होत होते. त्या बातम्यांचा वापर करून शॉर्ट फिल्म करण्याची कल्पना दिग्दर्शक इकारे यांना सुचली. अवघ्या साडेचार मिनिटाच्या या शॉर्ट फिल्मने सकारात्मकता जपण्याचा मोलाचा संदेश दिला आहे. यापूर्वीही त्यांनी कोरोनाविषयी जनजागृतीसाठी ' बाकी शून्य ' आणि ' काळजी ' या शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केल्या आहेत.
शॉर्टफिल्म भान याचे संकलन: तन्मय इकारे, छायाचित्रण: सोमा शिवशेट्टी, शहाजी महात्मे, कला दिग्दर्शन व पोस्टर: हर्षद लोहार, ध्वनी व संगीत संयोजन : जमीर कुरेशी, निर्माता: स्वाती इकारे, ऋचा इकारे, अभिनय: डॉ विनोद भालेराव, बाळासाहेब पवार, अमृत पांडेकर, सोमनाथ वैद्य यांनी काम पाहिले आहे.
--------------
शॉर्ट फिल्ममध्ये 'लोकमत'च्या बातम्यांचा वापर
शॉर्ट फिल्म सुरु असताना दिग्दर्शकांनी लोकमतचे विशेष आभार मानले. तसेच शॉर्ट फिल्म संपताना 'लोकमत'मध्ये आलेल्या सकारात्मक बातम्यांचा वापर करण्यात आला आहे. यातून समाजामध्ये खूप काही चांगले घडत असताना आपण नकारात्मक चर्चा टाळून सकारात्मक व्हावे याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
एखादा रुग्ण उपचार घेत असताना त्याच्या शेजारचा व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या आसपासचे घाबरतात. डॉक्टरांचे देखील असे म्हणणे आहे की, रुग्ण घाबरला तर त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी होते. कोरोना झाला म्हणजे जीवनच संपले असे वाटते. यातून लोकांनी बाहेर पडावे यासाठी श़ॉर्ट फिल्म बनवली. लोकमत मधील पॉझिटिव्ह स्टोरी पाहून आम्हाला ही कल्पना सुचली.
- रामचंद्र इकारे, संकल्पना, लेखन व दिग्दर्शन