अक्कलकोट तालुक्यात खते अन्‌ बियाण्यांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:38+5:302021-06-09T04:27:38+5:30

अक्कलकोट हा अवर्षणग्रस्त दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. यंदा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे लॉकडाऊनमुळे अडचणीत असतानाही ...

Shortage of fertilizers and seeds in Akkalkot taluka | अक्कलकोट तालुक्यात खते अन्‌ बियाण्यांचा तुटवडा

अक्कलकोट तालुक्यात खते अन्‌ बियाण्यांचा तुटवडा

Next

अक्कलकोट हा अवर्षणग्रस्त दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. यंदा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे लॉकडाऊनमुळे अडचणीत असतानाही शेतकऱ्यांनी हातउसने पैसे घेत पेरणीसाठी जोमाने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र सध्या कोणत्याही कृषी दुकानात ना रासायनिक खते, ना बी-बियाणे, काहीच मिळत नसल्याने शेतकरी हतबल बनला आहे.

अक्कलकोट शहरासह, मैंदर्गी, दुधनी, चप्पळगाव, हन्नूर, शिरवळ, वागदरी, सलगर, जेऊर, करजगी, तडवळ, नागणसुर, सिंदखेड, अक्कलकोट स्टेशन, तोळणूर येथे तब्बल १०० कृषी दुकाने आहेत. यापैकी कोणाकडेही खते, बी-बियाणे मिळेनाशी झाली नसल्याने सुरेश सूर्यवंशी, मल्लिनाथ भासगी, महादेव बिराजदार, सत्तार शेख आदी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या खतांचा तुटवडा...

- खरीप पेरणीसाठी लागणारे उडीद, मूग, तूर, सोयाबीन, भुईमूग अशा महाबीज असो किंवा इतर, अशी विविध प्रकारची बी-बियाणे उपलब्ध नाहीत. सर्वत्र तुटवडा भासत आहे. तसेच युरिया, सुपर वगळता जय किसान असो किंवा इतर कंपनीचे डीएपी, १०:२६:२६, १२:३२:१६, २०:२०:१३, १८:१८:१०, १५:१५:१५ असे कोणत्याही कंपनीची खते मिळेनाशी झाली आहेत.

शेतकऱ्यांचा अडचणींशी सामना

मध्यंतरी १३०० वरून १९०० रुपयेपर्यंत मजल मारलेल्या जय किसानच्या १०:२६:२६ यासह सर्व खते मुबलक होती. तेव्हा शेतकरी बांधवांतून तीव्र विरोध व्यक्त होत असताना, दर कमी करण्यात आले असले तरी, खते न मिळता तुटवडा भासत आहे. शासन अनुदान दिल्याशिवाय खते, बियाणे कमी किमतीत देणे परवडत नसल्याचे कंपन्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

----

तालुक्यातील सर्व दुकानदारांनी मान्सूनपूर्व पडलेल्या पावसामुळे लाखो रुपये गुंतवून खते, बी-बियाण्यांची मागणी केली आहे. मात्र शासन व कंपनीच्या ध्येय-धोरणामुळे पुरेशा प्रमाणात खते, बियाणे मिळत नाहीत. मागणीच्या केवळ दहा टक्के आणि ठराविक कंपनीचीच खते मिळत आहेत. यामुळे सर्व शेतकऱ्यांना न्याय देणे कठीण होत आहे.

- आप्पासाहेब पाटील, अध्यक्ष, रासायनिक खते, बी-बियाणे असो., अक्कलकोट तालुका.

----

रासायनिक खतांच्या दराचे चढउतार झाल्यामुळे दुकानदारांनी मागणी केले नाही. वरूनच खताचे रॅक आले नाही. तसेच महाबीज बी बियाण्यांचे तुटवडा भासण्याची शक्यता आहे म्हणून मागच्या वर्षीच मी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे ठेवण्याचे व पेरण्याचे आवाहन केले होते. येत्या आठवडाभरात सर्व प्रकारचे टंचाई दूर होईल.

- सूर्यकांत वरखेडकर, तालुका कृषी अधिकारी

Web Title: Shortage of fertilizers and seeds in Akkalkot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.