सोलापुरात सहा दिवसांपासून गॅस सिलिंडरची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 10:53 AM2019-09-06T10:53:28+5:302019-09-06T10:55:14+5:30
संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष; ऐन सणात लोकांची होतेय धावपळ; गोदामासमोर नागरिकांची गर्दी
सोलापूर : शहर व जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून घरगुती पुरवठ्याच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. ऐन सणात गॅस मिळत नसल्याने वितरकांच्या गोदामासमोर नागरिकांची गर्दी पडल्याचे चित्र दिसून आले.
शहर व जिल्ह्यात नागरिकांना घरगुती वापरासाठी मागणीप्रमाणे विविध कंपन्यांकडून गॅस सिलिंडर पुरविले जातात. पण गेल्या सहा दिवसांपासून गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. गणपती आणि गौरी सणाच्या तयारीसाठी नागरिकांना फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी गॅसचा जादा वापर होतो. घरातील गॅस अचानकपणे संपलेल्या नागरिकांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे आॅनलाईन बुकिंग केले खरे, पण सहा दिवस झाले सिलिंडरचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिक रिकामे झालेले सिलिंडर घेऊन वितरकाच्या गोदामासमोर गर्दी करताना दिसत आहेत. पण वितरकांनी स्टॉक संपल्याचे सांगून हात वर केले आहेत.
सहा दिवसांपूर्वी कंपन्यांकडून अचानकपणे सिलिंडरचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. भारत गॅस ही मोठी कंपनी आहे. शहरात १५ वितरकाच्या अधिपत्याखाली या कंपनीचे तीन लाख ग्राहक आहेत. वितरकांची मागणी दीड हजार असताना दोनशे सिलिंडर पुरविले जात आहेत. त्या खालोखाल इतर कंपन्याचे ग्राहक आहेत. सोलापूर जिल्हा व मराठवाड्यासाठी मुंबई व कोचीहून गॅस पुरवठा होतो. गेल्या आठवड्यात दोन्ही ठिकाणी कोणतीही समस्या नव्हती. असे असताना कंपन्याकडून गॅस सिलिंडर पुरविणे कमी झाले आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाºयांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या भांडणामुळे वितरकही वैतागले आहेत. विशेष धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सहा दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली तरी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
रॉकेलचा पुरवठा बंद
- शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गरिबांना मोफत गॅस कनेक्शन दिले. त्यामुळे घरातील चुली बंद झाल्या. गॅस कनेक्शन वाढल्यानंतर रॉकेलचा कोटा कमी करण्यात आला. लोकांना रॉकेल मिळणे बंद झाले. आता ऐन सणात सहा दिवसांपासून गॅस सिलिंडर न मिळाल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली नाहे. चूल नाही अन् रॉकेलही नाही, स्वयंपाक कसा करायचा असा सवाल गृहिणींनी उपस्थित केला आहे. इंडक्शन शेगडीवर दररोजचे घरगुती काम भागविले जात आहे. पण फराळाचे पदार्थ करण्यासाठी जळाऊ लाकूड शोधण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.
वितरकांना कोण विचारणार
- महसूल कर्मचाºयांच्या संपामुळे जिल्हा पुरवठा कार्यालयात शुकशुकाट होता. जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील निवडणूक आयोगाच्या व्हिडीओ कॉन्फरससाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाटील यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. गॅस सिलिंडरच्या टंचाईबाबत एसएमएस पाठविला तरी त्यांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. कंपनीकडून पुरवठा कमी झाल्याने वितरकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची कैफियत भारत गॅसचे वितरक सुधीर खरटमल यांनी सांगितले.
ऐन सणात नागरिकांना गॅस सिलिंडर मिळत नसेल तर ही बाब गंभीर आहे. कंपन्याकडून अचानकपणे इतका पुरवठा कमी का झाला याबाबत तातडीने सर्व कंपन्याच्या प्रमुख अधिकाºयांची शुक्रवारी बैठक घेतली जाईल. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
- रामचंद्र शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी