विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:26+5:302021-02-09T04:25:26+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर १४ गाळे उभे करुन शाळेचा रस्ता बंद केला आहे. गावक-यांच्या उठावानंतर ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर १४ गाळे उभे करुन शाळेचा रस्ता बंद केला आहे. गावक-यांच्या उठावानंतर प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली.. सोमवारी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेत धडकल्यानंतर कारवाईला अधिक वेग आला. सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड व गटविकास अधिकारी डाॅ. जस्मीन शेख यांना पत्र दिले आहे. या पत्रात विशेष पथक नेमूण अतिक्रमण काढण्यात यावे असे म्हटले आहे.
शिक्षणाधिकारी राठोड यांनी मुख्याध्यापक एम. एस. कोळी व इतरांना नोटीस दिली आहे. अतिक्रमणाला आपण जबाबदार असून ते काढण्यात यावे अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे. त्यात प्रशासक, ग्रामसेवक व शालेय व्यवस्थापन समितीमार्फत अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याची कारवाई करावी, असे म्हटले आहे. यात हलगर्जीपणा केल्यास आपणावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. एका दिवसात कागदोपत्री एवढा पत्रव्यवहार झाला असला तरी प्रत्यक्षात कारवाई कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
जे पेरल तेच उगवतय
शाळेतील मुलासमवेत आलेल्या पालकांनी सीईओं दिलीप स्वामी यांना भेटण्यानंतर अतिक्रमण केलेल्या गाळ्यात दारु, गुटखा सगळच मिळतय, मटकाही चालतोय असे सांगितले. आज शाळेच्या मुलांसमोर हे सगळं चालतय मग पुढे काय पेरल तेच उगवणार असे पालकांनी सांगितले.