कोर्टाचा अवमान केला म्हणून रेल्वेचे डीआरएम यांना कारणे दाखवा नोटीस
By विलास जळकोटकर | Published: January 6, 2024 05:23 PM2024-01-06T17:23:57+5:302024-01-06T17:24:12+5:30
२४ जानेवारीला सुनावणी : कर्मचाऱ्याच्या पगारीतील रक्कम पत्नीला दिली नाही
सोलापूर : रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पगारीतील रक्कम कपात करुन त्याच्या पत्नीला पोटगीपोटी न दिल्याप्रकरणी न्यायालयाचा अवमान झाला म्हणून कोर्टाने सोलापूर विभागाचे प्रमुख डीआरम यांना कारणे दाखवा नोटीस काढली. सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. पाटील यांनी ही नोटीस काढण्याचे आदेश बजावले आहेत. या प्रकरणाची सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, शहरातील मुर्गीनाला पिंडारी मज्जिद येथील झीनत आसिफ शेख हिचा विवाह रेल्वे कर्मचारी आसिफ अलीसाब शेख (रा. दाळ गल्ली, उत्तर सदर बाजार सोलापूर) याच्याशी झाले होते. कालांतराने त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर पतीसह सासरच्या लोकांनी संगनमत करून शारीरिक व मानसिक त्रास होऊ लागला. यातून कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी पीडित पत्नी झीनत आसिफ शेख यांनी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम १२ अन्वये ॲड. रियाज शेख यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती.
दरमहा ९ हजार पोटगीचा होता आदेश
या अर्जात पत्नीने न्यायालयामध्ये दर महिना उपजीविकेसाठी, पोटगी व घर भाड्याची मागणी केली होती. न्यायालयाने पत्नीची मागणी व गरजेचा विचार करून दरमहा ९ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिला होता. हा आदेश होऊनही पती आसिफ हा कोर्टामध्ये पोटगीची रक्कम भरत नसल्याने अर्जदाराने वकिलामार्फत न्यायालयामध्ये अर्ज सादर करून पती आसिफ शेख यांच्या पगारीतून रक्कम कपात करून मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता.सदर अर्ज देखील न्यायालयाने मंजूर करून सोलापूर रेल्वे विभाग प्रमुखांना लेखी पत्रा अन्वये दर महिना ९ हजार रुपये आसिफ शेख याच्या पगारीतून कपात करून अर्जदार झीनत शेख यांना देण्याचा आदेश बजावला होता.
दोन महिनेच मिळाली रक्कम
या आदेशाप्रमाणे केवळ २ महिनेच पत्नीला पगारातून कपातून रक्कम मिळाली परंतु डिसेंबर महिन्यामध्ये कोणतीही रक्कम मिळाली नाही. डीआरएम ऑफिस मध्ये जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता अर्जदारास उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
पुन्हा न्यायालयात धाव
रक्कम मिळणार नसल्याचे सांगितल्यानंतर अर्जदाराने वकिलामार्फत पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेतली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष अर्ज सादर करून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अर्जदारास रक्कम देण्यामध्ये संबंधीत कार्यालयाने कसुरी केली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे नमूद केले. सोलापूर विभागाचे रेल्वे प्रमुख डी आर एम यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची मागणी अर्जदाराच्या वतीने ॲड. रियाज शेख यांनी युक्तीवादात केली.
नोटिसीचा आदेश
हा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. पी. पाटील यांनी सोलापूर रेल्वे विभाग प्रमुख डी आर एम सेंट्रल रेल्वे सोलापूर डिव्हिजन यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश पारित केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ जानेवारी २०२४ रोजी आहे. अर्जदारातर्फे ॲड. रियाज शेख काम पाहत आहेत.