महाराष्टातून कर्नाटकात जायचंय आधी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:28 AM2021-02-25T04:28:00+5:302021-02-25T04:28:00+5:30
गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण देशात कोरोना रुग्ण नव्याने वाढत आहेत. यामुळे पुन्हा एकदा शासनाकडीन प्रतिबंधित उपाययोजना केल्या जात ...
गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण देशात कोरोना रुग्ण नव्याने वाढत आहेत. यामुळे पुन्हा एकदा शासनाकडीन प्रतिबंधित उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कलबुर्गीचे जिल्हाधिकारी जोत्सना यांनी राज्यात कोरोनाचे भडका उडण्यापूर्वीच उपाययोजना म्हणून महाराष्ट्र- कर्नाटक सीमा हद्दीत आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक तैनात केले आहे.
चेक पोस्ट तयार करून त्याठिकाणी प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे चोवीस तासाच्या आतील कोरोना टेस्ट नेगेटिव्ह रिपोर्ट नाही अशांना आल्या पावलाने परत जावे लागत आहे.
यासाठी चेक पोस्टवर कलबुर्गी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी श्रीशैल मळळी, शिवकुमार मठ, कर्मचारी गणेश समाणी, संतोष महाजनशशेट्टी, पोलीस कर्मचारी प्रदीप बल्ला, फयाज बडगेर, महसूल कर्मचारी बिरणा पुजारी, बसवराज वालीकर हे दिवसरात्र ठाण मांडून आहेत.
---
दोन दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती हद्दीत सिन्नूर गावाजवळ जिल्हाधिकारी जोत्सना यांच्या आदेशानुसार चेक पोस्टद्वारे तपासणी सुरु आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट नसणाऱ्या दोन्ही राज्यातील नागरिकांना ये-जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
--- दोन दिवसात दोन्ही राज्यातल्या ३०० वाहनांना परत पाठले
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काही डेपोच्या बसेस चोरट्या मार्गाने मूळगावी आल्या आहेत. यामुळे तीर्थक्षेत्र गाणगापूरला जाणाऱ्या भक्तांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अक्कलकोट येथे कर्नाटकातून दररोज जेऊरगी, कलबुर्गी, सिंदगी, आळंद, अफझलपूर, गुर्मीटकल अशा २५ बसेस येत होत्या. तसेच अक्कलकोट येथून अफझलपूर, आळंद, कलबुर्गी या डेपोत बस जात होत्या. त्या बंद करण्यात आल्या आहेत. तरीही बुधवारी आळंद मार्गे काही प्रमाणात शिथिलता होती. अफझलपूर मार्गावर मात्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अक्कलकोट येथून दररोज लाखो रुपयांचा भाजीपाला कलबुर्गी मार्केटला जात होता. तोही आता बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून मात्र अद्याप अशा प्रकारची पावले उचलली नाहीत.
फोटोओळ:
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती सिन्नूर गावाजवळ चेक पोस्टवर प्रवाशांची तपासणी करताना महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक.