श्रावणी सोमवार ; रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास सव्वाशे वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:37 AM2018-08-27T10:37:57+5:302018-08-27T10:39:15+5:30
श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पालखी उत्सव आणि शेवटच्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो.
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : दहाव्या शतकातच धर्मप्रसाराबरोबर जातीव्यवस्थेच्या विरोधात लोकांचे मत परिवर्तन करणाºया जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पालखी उत्सव आणि शेवटच्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो.
आंध्र प्रदेशातील कोलिपाक येथील सोमेश्वर लिंगाच्या पोटातून एकोराम, मारुळाराध्य, रेवणसिद्धेश्वर, रेणुकाचार्य, पंडिताराध्य या पाच जगद्गुरुंचा जन्म झाल्याचा आणि त्याच लिंगात त्यांचा शेवट झाल्याची आख्यायिका आहे. श्री रेवणसिद्धेश्वर धर्मप्रसारासाठी, सामान्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी, समाजातील अस्थिरता दूर करण्यासाठी पालखीतूनच भारत भ्रमण करायचे. त्यांनी कधीही या भूमीवर पाय ठेवले नाही. कोेल्हापूर, मंगळवेढामार्गे श्री रेवणसिद्धेश्वर सोलापूरच्या नगरीत दाखल झाले.
इथे येताच त्यांनी भूमीवर पाय ठेवले. शिष्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी तो गुरु रेवणसिद्धेश्वरांना विचारलाच. ‘या भूमीत एका योगपुरुषाचा जन्म होणार आहे’, असे सांगत भूमीवर माती आपल्या कपाळी लावली. पुढे १२ व्या शतकात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म झाल्याचे पुराणात ऐकावयास आणि पुस्तकांमधून वाचावयास मिळते.
रेवणसिद्धेश्वरांचे कार्य सर्वदूर पोहोचावे यासाठी पालखी सोहळा आणि रथोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. स्व. गंगाधर घटोळे, स्व. मलप्पा चिदरे, स्व. इरप्पा हिंगमिरे, स्व. सातप्पा दुलंगे, स्व. सिद्रामप्पा वळसंगे आदींच्या पुढाकारातून प्रथेला सुरुवात झाली. जोडभावी पेठेतील चिदरे वाड्यातून विधिवत पूजा करुन पालखी मिरवणुकीला प्रारंभ होतो. तेथून जुना अडत बाजार, कुंभारवेस, माणिक चौक, विजापूरवेस चौकमार्गे गुरुभेट येथे पालखी सोहळ्याचा विसावा घेतला जातो. तेथून ही मिरवणूक रंगभवन, सात रस्तामार्गे कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात येते. त्याच दिवशी सायंकाळी आलेल्या मार्गांनी मिरवणुकीची चिदरे वाड्यात सांगता होते.
अडत बाजार हलला... व्यापारी दुरावले !
- पूर्वी अडत बाजार जोडभावी पेठेत भरायचा. १९७८ साली हा बाजार (मार्केट यार्ड) हैदराबाद रोडवर (सध्याचे मार्केट यार्ड) स्थलांतर झाला. त्याआधी अडत व्यापारी, विक्रेते, भुसार व्यापारी पालखी सोहळ्यात आवर्जून सहभागी व्हायचे. जसा अडत बाजार दूर गेला तसे भाविकही सोहळ्यापासून दुरावले गेले.
रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची सेवा
- १८९० साली श्री रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची स्थापना झाली. ११८ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळास १९६८ साली मान्यता मिळाली. मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. सध्या मंडळाची धुरा इरसंगप्पा हिंगमिरे, गंगाधर यादवाड, अशोक चाकोते, राजेंद्र इंडे, केदार वारद आदींकडे आहे.
पूर्वजांनी सुरु केलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा पुढे नेत आहोत. श्रावणातल्या दर रविवारी मंडळाच्या वतीने अन्नदान केले जाते. युवा पिढी सोहळ्यात सामील व्हावी, अशी अपेक्षा आहे.
-इरसंगप्पा हिंगमिरे, अध्यक्ष, रेवणसिद्धेश्वर यात्रा कमिटी
पालखी सोहळा आणि रथोत्सवात समाजातील युवकांचा सहभाग अधिक असावा. तो सहभाग वाढला तर पालखी सोहळा आणि रथोत्सवाला मोठे स्वरुप येईल.
-राजेंद्र बिराजदार,
व्यवस्थापक- रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळ