सोलापुरात तयार झाल्या ११ हजार इको फ्रेंडली बाप्पांच्या ‘श्री’ मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:31 PM2019-08-24T12:31:36+5:302019-08-24T12:34:16+5:30
जनजागृतीचा परिणाम; पर्यापूरक गणेशमूर्तींनी शहरातील स्टॉल्स सजले, मागणीही वाढली
यशवंत सादूल
सोलापूर : सरकारने पर्यावरण रक्षणासाठी ‘पीओपी’च्या मूर्तींऐवजी मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उत्सवात पूजनासाठी वापरण्याचे आवाहन केले. त्यास सर्वत्र अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सोलापूरच्या पर्यावरणप्रेमी संघटनांनी मागील पाच ते सहा वर्षांपासून याबाबत जनजागृती केली. त्याला सोलापूरच्या गणेशभक्तांकडून प्रतिसाद मिळत आहे. मूर्तीकार आणि विक्रेत्यांकडे होय आम्हालाही इको फ्रेंडली गणेशमूर्ती घ्यायची आहे! असे सांगून सोलापूरकर भक्तमंडळी मागणी नोंदणी करत आहेत. ही मागणी लक्षात घेता सोलापुरात अकरा हजार इको फ्रेंडली मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
सोलापुरात पीओपीच्या जवळपास पाच लाख गणेशमूर्ती तयार होतात. त्यातील निम्म्याहून अधिक आंध्र, कर्नाटक, उर्वरित महाराष्ट्रात जातात. त्यामध्ये शहर व जिल्ह्यातील भक्तांसाठी अडीच लाख गणेशमूर्ती तयार केलेल्या असतात. गेल्या सात - आठ वर्षात इको फ्रेंडली गणेशमूर्तींबाबत जनजागरण झाल्यामुळे या प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे सोलापूरकरांचा कल वाढलेला आहे. यंदा जवळपास अकरा हजार मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत .सोलापुरात लष्कर भागातील मूर्तिकार राजेंद्र सगर, पांडुरंग सगर, विष्णू सगर हे इको फ्रेंडली मूर्ती बनविण्यात मग्न असल्याचे दिसून आले. मागील पाच पिढ्यांपासून हे कुटुंब शाडूच्या मूर्ती बनवित आहे. सध्या कुटुंबातील पंधरा -सोळा सदस्य यांमध्ये गुंतले आहेत.
विकास गोसावी हे कलाशिक्षक मागील आठ वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवितात. बाळे येथील कारखान्यात मागील सहा महिन्यांपासून या कामाला लागले असून त्यांच्याकडे सहा इंच ते तीन फूटपर्यंत शाडू माती व कागदी लगद्याच्या मूर्ती आहेत. नवी पेठ येथील स्टॉलवर या मूर्ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. दोनशे रुपयांपासून पंधरा हजार रूपयांपर्यंत किमती आहेत. पर्यावरण जागृती करत त्यांनी अकरा हजार विद्यार्थीआणि युवकांना मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. याशिवाय नितीन जाधव,विभूते परिवार, हे मूर्तीकार पर्यावरणपूरक मूर्ती तयार करतात. वसंत कॅप,मिरजगावकर, खडलोया बंधू, नागेश दास बंधू, इको फ्रेंडली ग्रुप असे आठ ते दहा विक्रेते आहेत.
‘आजोबा गणपतीला मागणी’
- आजोबा गणपती हे सोलापूरकरांचे श्रध्दास्थान. मूलत: पर्यावरणपूरक असलेल्या या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर गर्दी असते. सोलापूरकरांचा हा भाव ध्यानात घेऊन प्रथमच मूर्तीकारांनी ‘आजोबा गणपती’च्या छोट्या मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्तींना मोठी मागणी आहे. गणेश पूजनासाठी शास्त्रोक्त मूर्तींना जास्त मागणी आहे .यामध्ये प्रामुख्याने पद्मासन,दोन्ही पददर्शन, पितांबर, चौरंगावर आसनअस्थ ,बाळ गणपती,सुभाष,आजोबा गणपती ,बसवेश्वर,आदी मूर्ती असून मातीचे असल्याने भक्त श्रद्धेने मागणी करत आहेत असे सगर बंधू यांनी सांगितले.
पर्यावरण जागृती करण्याच्या चळवळीतून इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याकडे वळलो.सुरुवातीला एका गणपतीपासून सुरू केले. यंदा सातशे मूर्ती तयार केल्या आहेत.भक्तांमध्ये जागृती होऊन दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे. यामुळे कलाकारांच्या कलेला दाद मिळण्यासोबत श्रमाला किंमत मिळते.यापुढे पर्यावरण पूरक मूतीर्ची मागणी वाढतच जाईल .
- विकास गोसावी, पर्यावरण प्रेमी कलाशिक्षक
आमची पाचवी पिढी मूर्तिकलेच्या व्यवसायात असून मागील साठ वर्षांपासून शाडूच्या मूर्ती बनवितो.आठ- दहा वर्षांपूर्वी अचानकपणे ग्राहकांच्या मागणीनुसार पीओपीच्या मूर्ती बनवाव्या लागल्या. सध्या मात्र पूर्णपणे शाडूच्या मूर्ती शास्त्रीय पद्धतीने बनवितो.भक्तांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. मेहनतीला किंमत मिळते याचे समाधान आहे.
- राजेंद्र सगर , मूर्तीकार