द्वादशी दिवशीही श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:27 AM2021-02-25T04:27:52+5:302021-02-25T04:27:52+5:30
माघी यात्रेनिमित्त पंढरपूर शहर व परिसरासह विविध मठ, मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करू नये यासाठी एकादशीनंतर द्वादशीदिवशीही श्री विठ्ठल-रूक्मिणी ...
माघी यात्रेनिमित्त पंढरपूर शहर व परिसरासह विविध मठ, मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करू नये यासाठी एकादशीनंतर द्वादशीदिवशीही श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे मंदिर बंद ठेवण्यात आले. दरम्यान पंढरपुरात आलेल्या छोट्या छोट्या दिंड्यांमधील भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून हरिनामाचा गजर करून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. मंदिर परिसरात आलेल्या तुरळक भाविकांनी नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेऊन आपली वारी पूर्ण केली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रेदरम्यान भाविकांना मंदिर परिसरात येण्यास मनाई केल्याने भाविकांची गर्दी दिसून आली नाही. तसेच माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी केल्याने इतर जिल्ह्यातून येणाऱ्या दिंड्याही पंढरपुरात आल्या नाहीत. यामुळे चंद्रभागा नदीपात्र व प्रदक्षिणा मार्गावर यंदा केवळ स्थानिक दिंड्यांचाच सहभाग दिसून आला. या दिंड्यांमधील भाविकांनी चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिकाचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल मंदिरावरील कळसाचे व नामदेव पायरीचे दर्शन घेतले. प्रदक्षिणा पूर्ण करून आपली यात्रेची परंपरा पूर्ण केली.
----
मंदिर समितीच्या उत्पन्नावर परिणाम
माघी यात्रा रद्द झाल्याने गेल्या वर्षभरात लहान मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा समजला जाणारा जनावरांचा बाजारही रद्द झाल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.