गाणगापूरचे श्रीदत्त मंदिर खुले; भाविकांना मास्क, सॅनिटायझरची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:02+5:302020-12-29T04:22:02+5:30
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमावली करण्यात आली आहे. ठिकठिकाणी जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत. एकंदरीत गाणगापूर येथे भक्तिमय ...
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमावली करण्यात आली आहे. ठिकठिकाणी जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत. एकंदरीत गाणगापूर येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हा जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे सेक्रेटरी धनंजय पुजारी, सदाशिव पुजारी, गोपालभट्ट पुजारी, नंदकुमार पुजारी, चैतन्य पुजारी, बाळकृष्ण पुजारी, प्रसाद पुजारी, निरंजन पुजारी, मधुकरभट्ट पुजारी, वलभभट्ट पुजारी, राजेंद्र पुजारी, कृष्णभट्ट पुजारी, गोपाळ पुजारी परिश्रम घेत आहेत.
गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांना मास्क, सॅनिटायझर अन् फिजिकल डिस्टन्स सक्तीचे केले आहे. शिवाय एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना टप्प्याटप्प्याने प्रवेश दिला जाईल. मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये व ते मंदिरातून तत्काळ बाहेर कसे जातील याचेही नियोजन केले आहे. सर्वत्र कोरोनासंबंधी फलक लावले आहेत. तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येणार आहे. असे विविध प्रकारचे नियोजन केले आहे. दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांतून लाखो भक्त दत्त जयंतीनिमित्त येतात. जवळील भीमा-आम्रजा या नदीच्या संगमावर प्रशासनकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील पेढे गाणगापुरात
महाराष्ट्रातील कुंतलगिरी, पंढरपूर, मंगळवेढा आदी ठिकाणांहून हजारो क्विंटल खवा गाणगापूर नेला आहे. त्याचे पेढे बनवून भाविकांना प्रसाद म्हणून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रसाद, नारळ, सुगंधी अष्टगंध, हार, श्रींच्या मूर्ती याची दुकानेही थाटली आहेत.
असे असतील धार्मिक कार्यक्रम
मुख्यपीठ गाणगापूर येथे दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे नित्यनियमाने केले जाणारे विधिवत पूजन मंदिराचे पुजारी यांच्याच हस्ते होईल. दुपारी १२ वाजता पाळणा, १२.३० वाजता श्रींना महानैवेद्य दाखवण्यात येईल. त्यानंतर श्रींची आरती होईल. भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. नंतर भाविक घरोघरी जाऊन माधुकरी सेवा मागतील. संध्याकाळी ७.३० वाजता महामंगळ आरती होईल. बुधवारी पौर्णिमा असून, त्या दिवशी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमानंतर संध्याकाळी निर्गुण मठ श्री दत्त मंदिर ते मारुती मंदिरापर्यंत रथोत्सव निघेल. तेव्हा श्रींची मूर्ती रथात ठेवण्यात येईल.
कोट :::::::::::
श्री दत्त जयंतीनिमित्त लाखो भाविक परराज्यातून येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली आहे. भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठीची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. ४ ते ५ राज्यांतून भाविक येत असतात. एकाच वेळी गर्दी करू नये. यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - नामदेव राठोड,
प्रशासनाधिकारी, मंदिर समिती, गाणगापूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक
फोटो
२८गाणगापूर०१, ०२