शुभमंगल ; अडीच फुटी विशालला मिळाली तीन फुटी जोडीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:53 AM2018-11-27T10:53:32+5:302018-11-27T10:56:32+5:30
सांगोला : अजनाळे (ता. सांगोला) येथील कुंडलिक दिगंबर भंडगे यांचे चिरंजीव विशाल व अकोला (ता. सांगोला) येथील कै. विष्णू ...
सांगोला : अजनाळे (ता. सांगोला) येथील कुंडलिक दिगंबर भंडगे यांचे चिरंजीव विशाल व अकोला (ता. सांगोला) येथील कै. विष्णू कृष्णा गेजगे यांची कन्या शारदा हे दोघे रविवारी २५ नोव्हेंबर रोजी दु. १.१५ वा. या शुभमुहूर्तावर बोहल्यावर चढले. विशेष म्हणजे अडीच फुटी विशालला व तीन फुटी जोडदार मिळाल्याने हा विवाह सोहळा पाहण्यासाठी अजनाळेसह पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.
म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. याची प्रचिती अजनाळे गावात आली. वाघ्या मुरळीच्या पथकातील व गावाच्या पंचक्रोशीतील सर्वांना खदखदून हसवणारा हसमुख म्हणजे विशाल याची उंची २.५ फुटापेक्षाही कमी आहे. तरीही वडील कुंडलिक भंडगे यांनी विशालच्या लग्नासाठी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुंडलिक भंडगे यांना अकोला येथील कै. विष्णू गेजगे यांची ३ फूट उंची असलेली शारदा लग्नासाठी वधू असल्याचे समजले.
रितीरिवाजाप्रमाणे भंडगे, गेजगे यांच्याकडून मुला-मुलीची पसंती होऊन विवाहाचा मुहूर्त ठरला. कुंडलिक भंडगे यांनी मुलाचे लग्न धुमधडाक्यात करायचे या जिद्दीने लग्नासाठी गावातील खंडोबा मंदिराजवळ मांडव उभा केला. स्पिकरवर जुन्या-नव्या गाण्यांची मैफल रंगली. लग्नासाठी ग्रामस्थांबरोबर गाव परिसरातील राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले. रविवार २५ रोजी हळदीच्या कार्यक्रमानंतर सकाळी ११ वा.च्या सुमारास विशालचे घोड्यावरुन डॉल्बीच्या आवाजात वाजत गाजत पारणे निघाले. विशालने मारुतीचे दर्शन घेतले. पारणे मंगल कार्यालयाकडे जात असताना एरव्ही सर्वांना खदखदून हसवणाºया विशालला आपल्याच लग्नात नाचण्याचा मोह आवरला नाही.
शिक्षणातही शारदा सरस
अवघी २.५ फूट उंची असलेल्या विशालचे शिक्षण सहावीपर्यंत झाले आहे. तर ३ फूट उंची असलेल्या शारदाचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. शारदाचे वडील मयत झाले आहेत. तर विशाल शिवरत्न वाघ्यामुरळी पार्टीमध्ये विनोदी भूमिका करीत सर्वांना हसवून मिळेल त्या पैशातून आपली उपजीविका भागवतो.