coronavirus; अकरा दिवसांसाठी शटर डाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता सोलापुरात सर्वच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 10:47 AM2020-03-21T10:47:03+5:302020-03-21T10:53:26+5:30
कोरोना इफेक्ट : ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद
सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी जारी केला आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा दुकाने, मेडिकल, सरकारी कार्यालये, बँका, रेस्टॉरंट, खानावळ यांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी नवीपेठेसह सर्व प्रमुख दुकानांमध्ये महत्त्वाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली. जणू दिवाळीसारखी भरपूर खरेदी करण्याचा सपाटाच अनेकांनी लावला.
महाराष्ट्र शासनाने राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाºया संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने साथीच्या नियंत्रणाबाबत प्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणणे व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वीच सर्व मॉल्स, आठवडा बाजार, जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या गर्दीमुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेता शुक्रवारी दागिने, कापड दुकाने, आॅटोमोबाईल क्षेत्रातील वाहन खरेदी-विक्री, भांड्यांची दुकाने, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीची दुकाने, टिंबर, प्लायवूड व इतर दुकाने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूची संक्रमण अवस्था पाहता संपर्काचा व्यापक परिणाम असल्याने जिल्ह्यातील सर्वप्रकारची दुकाने, सेवा आस्थापना, उपाहार व खाद्यगृहे, खानावळ, क्लब, पब, व्हिडिओ पार्लर, आॅनलाईन सेंटर अशी गर्दी होणारी ठिकाणे ३१ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
हे राहतील बंद
- - सर्व प्रकारचे मॉल्स
- - दागिन्यांची दुकाने
- - कापडाची दुकाने
- - भांडी, साहित्याची दुकाने
- - आॅटोमोबाईल दुकाने
- - इलेक्ट्रिक वस्तू
- - इलेक्ट्रॉनिक वस्तू
- - टिंबर, प्लायवूडची दुकाने
यांना आहे परवानगी
- - सर्व शासकीय कार्यालये
- - दवाखाने, लॅब व कर्मचारी
- - रेल्वे, एसटी, रिक्षा, बससेवा
- - अंत्ययात्रा व अंत्यविधीचे ठिकाण
- - किराणा, दूध, भाजी विक्री केंद्र
- - मेडिकल, रक्तपेढी
- - पेट्रोलपंप, रेशन दुकान
- - लॉजचे रेस्टॉरंट
- - वसतिगृह विद्यार्थी खानावळ
- - परीक्षा केंद्र व पर्यवेक्षकांचे काम
- - प्रसारमाध्यमांची कार्यालये
- - निर्मिती करणाºया कंपन्या
- - बँका व मोबाईल सेवा