मोठी बातमी! सिध्देश्वर साखर कारखाना दोन वर्षे बंद राहणार; धर्मराज काडादी यांची असहाय स्पष्टोक्ती
By राकेश कदम | Published: June 16, 2023 07:08 PM2023-06-16T19:08:22+5:302023-06-16T19:08:35+5:30
सोलापूर जिल्ह्यातील सिध्देश्वर साखर कारखाना दोन वर्षे बंद राहणार आहे.
सोलापूर: चिमणी पाडल्यामुळे सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना नेस्तानाबूत झाला. कारखान्याला पुढील दोन वर्षे गाळप करता येणार नाही, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी शुक्रवारी दिली. सर्व अडथळ्यांवर मात करून आगामी काळात कारखाना चालू करून दाखवू, असे काडादी म्हणाले.
महापालिकेने पोलिस बंदोबस्तात गुरुवारी कारखान्याची चिमणी पाडली. काडादींनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेउन या कारवाईवर भाष्य केले. काडादी म्हणाले, सिध्देश्वरची चिमणी विमानतळाच्या धावपट्टीला अडथळा ठरत नव्हती. ‘डिजीसीए’चा सर्व्हे चुकला होता. त्यामुळेच हायकोर्टाने पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. नव्या अहवालाची वाट न पाहता कारवाई करण्यात आली. चिमणीवर कारखान्याचे गाळप आणि सहवीज निर्मिती प्रकल्प चालायचा. आता नव्याने चिमणी उभारावी लागेल. त्याची जागा शोधणे, नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेणे यासाठी वेळ लागेल. यात किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. चिमणी उभारल्याशिवाय कारखाना सुरू करणे अशक्य आहे, असेही काडादी म्हणाले.