सिध्दरामेश्वर यात्रा: संबळच्या निनाद अन् 'हर्र बोला हर्र'च्या जयघोषात नंदीध्वजांना गंगास्नान
By Appasaheb.patil | Published: January 15, 2024 01:19 PM2024-01-15T13:19:28+5:302024-01-15T13:20:11+5:30
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोमवार सकाळची वेळ..हवेत हलकासा गारवा..मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी.. संबळच्या निनादात..हर्र बोला हर्र च्या जयघोषात मानाच्या सातही ...
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोमवार सकाळची वेळ..हवेत हलकासा गारवा..मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी.. संबळच्या निनादात..हर्र बोला हर्र च्या जयघोषात मानाच्या सातही नंदीध्वजांना हळद लावून करमुटगी स्नान घालून हळद काढण्यात आली. दरम्यान, अमृतलिंगाची पूजा करून गंगापूजन करण्याचा धार्मिक विधी सोमवारी पार पडला. याचवेळी हळद आणि तेलाच्या मिश्रणाने श्री सिद्धेश्वरांची मूर्ती, योगदंडास स्नान घालण्यात आले. यावेळी मंदिर परिसरातील वातावरण अतिशय भक्तीमय झाले होते.
ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर यात्रेतील तैलाभिषेक व अक्षता सोहळा या दोन धार्मिक विधींनंतर सोमवारी नंदीध्वजांना करमुटगी स्नान साेहळा सकाळच्या सत्रात उत्साही वातावरणात पार पडला. परंपरेप्रमाणे सकाळी नऊ वाजता हिरेहब्बू वाड्यात मानकऱ्यांच्या हस्ते नंदीध्वजांचे पूजन झाले. संबळ आणि हलग्यांच्या निनादात मिरवणुकीने सातही नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ आले. प्रथम श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडास हळद व तेलाचा लेप लावून करमुटगी स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखीतील उत्सव मूर्तीस करमुटगी स्नान घातले. त्यापाठोपाठ सातही नंदीध्वजांना तलावात एकाच वेळी करमुटगी स्नान घालण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांचे मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते अमृत लिंगाजवळ गंगापूजन करण्यात आले. देशमुखांना हिरेहब्बूंकडून विडा देण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमानंतर मानाचे नंदीध्वज हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ होतात.