सिद्धेश्वर, हुतात्मा, उद्यान, कोणार्कसह मुंबई एक्स्प्रेसचे वेटिंग अडीचशेच्या पुढे
By Appasaheb.patil | Published: October 31, 2022 11:32 AM2022-10-31T11:32:10+5:302022-10-31T11:33:25+5:30
प्रवासी गाड्या हाऊसफुल्ल; दिवाळीनंतर नोकरदारांचा परतीचा प्रवास
सोलापूर : आनंदाचा सण म्हणजे दिवाळी.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, सोलापूरहून पुणे, मुंबई, हैदराबादकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकिटाचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी ही २०० पेक्षाही जास्त झाली आहे.
दिवाळी असल्यामुळे बाहेरगावी असलेली अनेक कुटुंबे आपल्या गावी येतात. त्यामुळे त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले होते. २० ऑक्टोबरपासून रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी आता परतीच्या प्रवासाला लागले असून, आरक्षण तिकिटे काढण्यास स्थानकावरील खिडकीवर जाऊन चौकशी करताना त्यांना २०० पेक्षा अधिक वेटिंग असलेली तिकिटे मिळत आहेत.
----------
मुंबई-पुण्याला जाणाऱ्या सर्वच गाड्यांना सर्वाधिक गर्दी
सोलापूरहून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सर्वाधिक गर्दी आहे. सिद्धेश्वर, हुतात्मा, विशाखापट्टम, भुवनेश्वर, गदग, हैदराबाद, कर्नाटक आदी एक्स्प्रेस गाड्यांना हाऊसफुल्ल गर्दी आहे. मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्यांमध्येही दिवाळीच्या दिवसांमध्ये जागा उपलब्ध नाही. रेल्वेचे प्रवासी अन्य पर्यायी मार्गाने प्रवास करीत आहेत.
--------
ट्रॅव्हल्सलाही वाढली गर्दी...
रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने सोलापुरातील अनेक रेल्वे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवासाला पसंती देत आहेत. पुणे, मुंबईला जाणाऱ्या सर्वच कंपन्यांचे ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल आहेत. अन्य राज्यातून सोलापूरमार्गे जाणाऱ्या अनेक गाड्यांही सोलापुरात न थांबता थेट पुणे, मुंबईकडे जात आहेत. शिवाय अनेक प्रवासी खासगी बस, खासगी गाड्यांचाही आधार घेत आहेत.
-------
रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने रेल्वेचे प्रवासी आता खासगी गाड्यांमधून प्रवास करू लागले आहेत. अन्य सण, उत्सवकाळात विशेष गाड्या चालविणारे रेल्वे प्रशासन दिवाळीत विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय का घेत नाही? रेल्वेचे लाखाे प्रवाशांनी एसटी, खासगी ट्रॅव्हल्स व अन्य वाहनांनी प्रवास केला.
- राजाभाऊ जाधव, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर
---------
यंदा दिवाळीतील गर्दी लक्षात घेता सोलापूरच्या रेल्वे प्रशासनाने एकही विशेष रेल्वे गाडी चालविली नाही. आहे त्या गाड्यांमधून लोकांनी प्रवास केला. दरम्यान, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने लोकांनी अन्य वाहनांचा आधार घेत प्रवास केला. दिवाळीत विशेष गाड्या चालवायला हव्या होत्या.
- राजेंद्र कांबळे, रेल्वे प्रवासी
---------