घड्याळ, ब्लूटूथ, स्पीकरची फूटपाथवर विक्री; कांदे, बटाट्यांप्रमाणे सोलापूरकरांकडून खरेदी
By काशिनाथ वाघमारे | Published: September 23, 2023 05:12 PM2023-09-23T17:12:23+5:302023-09-23T17:12:37+5:30
होटगी रोडवर वाहनांच्या शोरुमपासून काही अंतरावर फुटपाथवर शनिवारी सकाळी घड्याळ, ब्लूटूथ, स्पीकरसह अनेक वस्तूची विक्री परजिल्ह्यातील महिलांकडून होताना पहायला मिळाले.
सोलापूर : होटगी रोडवर वाहनांच्या शोरुमपासून काही अंतरावर फुटपाथवर शनिवारी सकाळी घड्याळ, ब्लूटूथ, स्पीकरसह अनेक वस्तूची विक्री परजिल्ह्यातील महिलांकडून होताना पहायला मिळाले. हौशी सोलापूरकरांनीही स्वस्तात मिळतय म्हणून गर्दी केली आणि खरोखरच कांदे, बटाट्यांप्रमाणे या वस्तू खरेदी केल्या. महागड्या या वस्तू निम्म्याहून कमी किमतीत विकणा-या महिलांकडे चौकशी केली असता 'आम्ही जळगाववासिय...आमच्याकडे स्वस्तात मिळतात' म्हणत उत्तर दिले. विविध उद्योग, सर्वप्रकारच्या बाजार पेठांचे वैशिष्ठ्यपूर्ण शहर म्हणून सोलापूरची ओळख. या शहरात ब-याच वस्तुदेखील खुल्या बाजारात अर्थात त्या सोयीच्या ठिकाणी मांडून अर्थाजन करण्याची प्रथा रुढ होत आहे.
विशेषत: स्वस्ताई झाली की कांदे, बटाटे रस्त्याच्या कडेला जोर जोरात ओरडून विकतात आणि खरेदीसाठी गर्दी होते तशी स्थिती शनिवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजता होटगी रोडवर कार शोरूमजवळ पाहायला मिळाली. विशेषत: सण, उत्सवांचा काळ असून आज गौरी विसर्जनादिवसी सकाळी १२ महिला फूटपाथवर या वस्तू विकत होत्या. फूटपाथवर थांबलेल्या महिलांकडे विविध घड्याळे, मोबाईल ब्लू ट्यूथ, छोटे होम स्पीकर अशा अनेक जणू ब्रँडेड कपंन्याच्या वस्तूच होत्या. बाहेर बाजारात ज्या किमतीत मिळतात त्याहून निम्म्या किमतीत या वस्तू विकल्या गेल्या. चारशे रुपयांपासून घड्याळं, सहाशे रुपयांपासून ब्लू ट्यूथ विकले गेले.