खेड-भोसे परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन; जनावरांवर केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:58 AM2020-09-27T11:58:14+5:302020-09-27T11:58:36+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पटवर्धन कुरोली - खेड भोसे परिसरात शुक्रवारपासून बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन गावकऱ्यांना होत होते. काल, शनिवारी (दि. २६) मध्यरात्री राजाराम गोरख पवार यांच्या घराशेजारी बांधलेल्या रेडकावरती बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान आप्पासो पवार हे ऊसाला पाणी देण्याचे काम करीत होते. यावेळी त्यांना बिबट्यासदृश प्राणी दिसला. बिबट्यासदृश्य प्राण्याने त्यांचा पाठलाग सुरू केल्याने ते धावत सुटले. काही अंतरावर जाताच त्या प्राण्याने तेथून पळ काढला. सदर घटनेनंतर वन अधिकारी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली. रात्री बारापर्यंत वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवून होते.
शनिवारी मध्यरात्रीनंतर राजाराम पवार यांच्या घराशेजारी बांधलेल्या रेडकावरती हल्ला केला. या घटनेबाबत वन विभागाला कळविण्यात आले आहे. बिबट्या सदृश्य प्राण्याच्या दहशतीमुळे खेडभोसे, शेवते, व्होळे, पटवर्धनकुरोली, देवडे, सुगाव भोसे गावामध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या सदृश्य प्राण्याला पकडण्याची मागणी गावकऱ्यांतुन होत आहे.