फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:29 PM2019-01-19T12:29:46+5:302019-01-19T12:32:20+5:30
सोलापूर : केंद्र शासनाच्या उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेश झाला असून, फेब्रुवारी महिन्यात सोलापूर- मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत ...
सोलापूर : केंद्र शासनाच्या उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेश झाला असून, फेब्रुवारी महिन्यात सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हटविल्याखेरीज ही सेवा सुरू होणार नसल्याचे एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारखान्याची चिमणी पुन्हा रडारवर आली असून, चिमणीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी सोलापुरातील उद्योजकांनी केली आहे.
केंद्र शासनाने २०१६ मध्ये उडान योजना जाहीर केली. यात सोलापूरचाही समावेश होता. उडान योजना जाहीर झाल्यानंतर सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाºयांनी होटगी रोड विमानतळाची पाहणी केली. त्यात त्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचा अहवाल दिला.
त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला चिमणी हटविण्याबाबत नोटीस दिली. जून २०१७ मध्ये यासंदर्भात कारवाई सुरू केल्यानंतर कारखान्यातील कामगारांनी आंदोलन केले.
हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला. मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला स्थगिती दिली. यानंतर कारखाना प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. आॅक्टोबर २०१७ मध्ये कारखान्याच्या कामगार मंडळाने उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून चिमणी कारवाईला स्थगिती मागितली. कारखाना प्रशासन आणि कामगार मंडळाची याचिका आॅगस्ट २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिकेला पत्र पाठवून चिमणी पाडण्याच्या कारवाईबाबत हालचाली सुरू केल्या होत्या.
१७ आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौºयावर आले. दुष्काळी परिस्थिती आणि उसाचे अतिरिक्त क्षेत्र यामुळे यावर्षी चिमणीला पुन्हा अभय देत असल्याचे सांगितले. परंतु, कारखान्यानेपर्यायी चिमणी उभारण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान व्यावसायिकांबरोबरच कार्पोरेट कंपन्यांच्या सोलापूरातील अधिकाºयांनाही विमान सेवेची प्रतीक्षा असून, कंपन्यांच्या बैठकासाठी त्यांना मुंबईला जावे लागत असल्याने विमान सेवा सोयीची होणार आहे.
सहा महिन्यांपूर्वी वगळले, आता पुन्हा
- सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर होत नसल्याने उडान योजनेतून सोलापूरला वगळण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी रोजी सोलापुरात घेतलेल्या जाहीर सभेत उडान योजनेतून सोलापुरात विमानसेवा सुरू होईल, असे जाहीर केले. त्यानंतर मंत्रालयातून हालचाली झाल्या आणि उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेश झाल्याचे वृत्त आले.
फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होणार असेल तर आनंदच आहे. पण एअरपोर्ट आॅफ अॅथॉरिटीने चिमणीचा अडथळा दूर केल्याशिवाय विमानसेवा सुरू करता येणार नाही, हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याशिवाय डीजीसीए परवानगी देणार नाही. प्रथम त्यासंदर्भात काम झाले पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.
- केतन शहा, सचिव, चेंबर आॅफ कॉमर्स.
उडान योजनेत पुन्हा समाविष्ट झाल्यामुळे सोलापूरला पुढे जाण्याची चांगली संधी मिळाली आहे. मुंबईला जाणाºया दोन रेल्वेतील एसी कोच भरून असतात. आमच्या हॉटेलसह शहरातील इतर मोठ्या हॉटेलमधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त रूम नियमितपणे बुक असतात. अशा परिस्थितीत सोलापुरातून सुरू होणाºया विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, याची शाश्वती आहे. त्यामुळे विमानसेवेतील अडथळे दूर झाले पाहिजेत.
- राम रेड्डी, उद्योजक, सोलापूर.
पर्यायी चिमणीचे काम नाहीच?
मुख्यमंत्र्यांनी जून २०१७ मध्ये चिमणीच्या पाडकामाला स्थगिती देताना कारखान्याने पर्यायी चिमणी उभारण्याच्या कामाला सुरुवात करावी, असे सांगितले होते. जानेवारी २०१८ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत जिल्हाधिकाºयांनी कारखाना व्यवस्थापन आणि एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाºयांच्या समन्वय बैठका घडवून आणल्या. पण कारखान्याने पर्यायी चिमणी उभारण्यास अद्यापही सुरुवात केलेली नाही. एअरपोर्ट अॅथॉरिटीने पर्यायी जागा सुचवावी, यावर कारखाना व्यवस्थापन अडून आहे.