तडवळमध्ये सन्नाटा, बाजारपेठ बंद

By admin | Published: June 3, 2014 12:51 AM2014-06-03T00:51:49+5:302014-06-03T00:51:49+5:30

मुल्ला कुटुंबीयांवरील दुर्घटना; हुंदका, आक्रोशाने परिसर गहिवरला

Silence in market, closed market | तडवळमध्ये सन्नाटा, बाजारपेठ बंद

तडवळमध्ये सन्नाटा, बाजारपेठ बंद

Next

अक्कलकोट :गुलबर्गा रस्त्यावर घडलेल्या अपघातामध्ये मुल्ला कुटुंबातील १६ जण ठार झाल्याची बातमी भ्रमणध्वनीद्वारे तडवळला धडकताच ग्रामस्थांना एकच धक्का बसला आणि संपूर्ण गाव रस्त्यावर लोटले अन् चर्चा सुरू झाली शोककळेची. लागलीच चार जीपमधून मदतीसाठी काही माणसे गुलबर्ग्याकडे रवाना झाली. घडलेल्या घटनेने सन्नाटा पसरलेल्या गावातील दिवसभर बाजारपेठ बंदच होती. हुंदका, आक्रोशाने तडवळ परिसरही गहिवरला. सोमवारी पहाटे तडवळचे मुल्ला कुटुंबीय देवकार्यासाठी गुलबर्गा येथे गेल्याचे ग्रामस्थांना माहिती होते. पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान गावातील विविध प्रमुखांना या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून मिळाली अन् नेहमी असं म्हटलं जातं की, पहाटेचे फोन विशेषत: दु:खद घटनेचेच असतात. ही वार्ता तडवळकरांसाठी सोमवारी काळवार्ता ठरली. गावकर्‍यांना बसलेल्या धक्क्यातून सावरत, काही प्रमुख मंडळींनी चार जीप घेऊन केवळ दीड तासात घटनास्थळी पोहोचले़ नंतर ग्रामस्थ एकत्र येत मुल्ला कुटुंबात घराकडे राहिलेल्या वयोवृद्ध महंमद मुल्ला यांना धीर देत होते आणि अंत्यविधीसाठी तयारी करू लागले. वेळोवेळी भ्रमणध्वनीवरून माहिती घेत होते. दरम्यान पंचक्रोशीतील नागरिकांचे फोन येत होते. बघता बघता तालुका, जिल्हाभर ही बातमी पसरली. संपूर्ण तालुकावासीयांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. सायंकाळी ७ वा. पुरूष, स्त्रियांचे मृतदेह गावात घेऊन येत होते. संपूर्ण गावाच्या रडण्याने परिसरात हुंदके, आक्रोश आणि आक्रोशच होता. हुंदक्याने भरलेल्या वातावरणात रात्री ८.३० वा. मुस्लीम स्मशानभूमीत या सर्वांवर दफनविधी करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे संचालक शिवानंद पाटील, नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, सभापती मल्लिकार्जुन पाटील, फारुक शाब्दी, सरपंच पवन बनसोडे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक आण्णाराव याबाजी, माजी सरपंच संजय याबाजी, रामचंद्र अरवत, बाबुराव पाटील, नीलप्पा विजापुरे यांच्यासह हजारो जणांनी सहभाग नोंदवित मुल्ला कुटुंबाला धीर दिला. -

----------------------

जखमी कुटुंब व आपद्ग्रस्तांना तत्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून, ही घटना दुर्दैवी आहे. पहिल्यांदाच तालुक्यात अशी घटना घडली आहे. रूग्णालयाच्या अधिकार्‍यांना जखमींची काळजी घेण्यासाठी सांगितले आहे. - सिद्रामप्पा पाटील आमदार, अक्कलकोट -

 

Web Title: Silence in market, closed market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.