पाच गावातील सात चितांवर एकाचवेळी दिला अग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:18+5:302021-04-19T04:20:18+5:30
कुर्डूवाडी : शनिवारचा दिवस कुर्डूवाडीकरांसाठी अक्षरशः काळा दिवस ठरला. येथील स्मशानभूमीत विविध गावांतील विविध जाती धर्माच्या एकूण सात चिता ...
कुर्डूवाडी : शनिवारचा दिवस कुर्डूवाडीकरांसाठी अक्षरशः काळा दिवस ठरला. येथील स्मशानभूमीत विविध गावांतील विविध जाती धर्माच्या एकूण सात चिता जळताना पाहून नागरिकांचे मन हेलावून गेले अन स्मशानभूमीही गहिवरून गेली. जवळ जाऊन अंत्यदर्शनही घेता आले नाही याचे शल्य बोचत राहिले. रक्ताच्या नात्यातील माणसांना दूर थांबावे लागल्याची खंत व्यक्त करीत अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी लागली.
माढा तालुक्यात दिवसेंदिवस काेराेना बाधित रुग्ण वाढत आहेत. वाढत्या बाधित रुग्णांमुळे कुर्डूवाडी शहरात तिन्ही प्रतिबंधात्मक हेल्थ सेंटरमधील सर्व प्रकारचे बेड हाऊस फुल्ल झाले आहेत.
कुर्डूवाडीसह माढा तालुक्यातील गावे ही गेल्या तेरा महिन्यांपासून काेराेनाशी लढा देत आहेत. कोराेनाच्या पहिला लाटेत जेवढे नुकसान झाले नाही त्यापेक्षा अधिक पटीने आता या दुसऱ्या लाटेत हाेत आहे. कुर्डूवाडी शहरात तेरा महिन्यात कोराेनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात विविध गावातून मरण पावणाऱ्यांची संख्या ही १०० वर गेली आहे.
कुर्डूवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष व १९ नगरसेवक आहेत. कोरोनाच्या भयाण मृत्यू तांडवाच्या काळात यापैकी कोणीही समोर येऊन नागरिकांची मदत करताना दिसत नाहीत. येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी मुंबई नगरपालिकेचा आदर्श घेण्याची मागणी डॉ. विलास मेहता यांनी केली आहे.
१४९ जणांवर कोरोनाचे उपचार
कुर्डूवाडी शहरात रविवार अखेर १४९ जणांवर कोराेनाचे उपचार सुरू आहेत. तालुक्यात १३०० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कुर्डूवाडीत आतापर्यंत एकूण ८८४ जणांना कोरोनाची लागण झाली हाेती. त्यातील ७०१ रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत. शहरात आजपर्यंत ६७५७ नागरिकांची काेराेनाची तपासणी करण्यात आली आहे.
.......
फोटो : १९ कुर्डूवाडी
कुर्डूवाडी स्मशानभूमीत शनिवारी पाच गावांतील कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या सात चितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.