सीना जोडकालवा योजना बारा वर्षांपासून सरकार दरबारी प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:14+5:302021-05-11T04:23:14+5:30
सन २००९ मध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी पहिल्याच अधिवेशनात सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून सीना-भोगावती योजना मांडली होती. तत्कालीन ...
सन २००९ मध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी पहिल्याच अधिवेशनात सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून सीना-भोगावती योजना मांडली होती. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक करीत योजनेचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश देताना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे २० लाख रुपयांची तरतूद केली होती. त्याचे सर्वेक्षण व अन्वेषण करण्यात आले,परंतु योजनेचा अहवाल तसाच प्रलंबित राहिला आहे.
------
काय होती मूळ योजना ?
उजनीतून सीना-भोगावती जोड कालव्यातून सीना नदीत सोडलेले पाणी गुरुत्वीय पद्धतीने भोगावती नदीत आणि तेथून एकरुख तलावात आणण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. ५५ किमी अंतरावरील रिधोरे बंधाऱ्यातून कालवा आणि बोगद्यातून भोगावती नदीत तडवळे को.प. बंधाऱ्यात आणि बोगद्यातून एकरुख तलावात अशी ही योजना होती. त्यासाठी ७६९ कोटी खर्च अपेक्षित होता.
----
योजनेची वैशिष्ट्ये अशी
सीना-भोगावती या योजनेतून गुरुत्वीय पद्धतीने उजनीचे पाणी सोलापूर शहरालगत एकरुख तलावात येऊ शकते, त्यासाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत पंपाचे प्रतिवर्षी किमान दोन कोटी वीज बिलाची बचत होणार आहे. योजनेत नद्या अन् बोगद्यातून पाणी येणार असल्याने भूसंपादनाचा खर्च अत्यंत कमी असणार आहे. पाणी सोलापूर शहराच्या उशाशी येऊन थांबणार असल्याने साठवण टाक्यांच्या खर्चात बचत होऊ शकते. वर्षभरात चार टीएमसी पाणी या योजनेतून उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढणारी ही योजना आहे.
----
कौतुक हवेतच विरले, योजना कुठे अडखळली?
विधिमंडळातील सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी मांडलेल्या या योजनेचे कौतुक झाले. तत्कालीन पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी तर वर्षभरात या योजनेचे काम सुरू करणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले़, पण योजना कुठे अडखळली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
--