सिंघल रजेवर; गुडेवार सीईओ
By admin | Published: June 13, 2014 12:40 AM2014-06-13T00:40:28+5:302014-06-13T00:40:28+5:30
गुरुवारी निघाला आदेश; गुडेवार लागले कामाला
सोलापूर: जिल्हा परिषद सीईओ श्वेता सिंघल या अखेर प्रसूती रजेवर गेल्या असून मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. जि. प. पदाधिकाऱ्यांनीच गुडेवार यांच्याकडे पदभार देण्याची मागणी करणारे पत्र दिले होते.
तुकाराम कासार यांच्या कारभाराला कंटाळलेल्या पदाधिकाऱ्यांना सिंघल या काहीतरी करतील, अशी अपेक्षा होती. १० फेब्रुवारी २०१४ रोजी पदभार घेतल्यानंतर ‘डॅशिंग’ काम न केल्याने कासारच बरे म्हणण्याची वेळ आली. जिल्हा परिषदेचे खरे कामकाज ग्रामीण भागात आहे. प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र-उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने सीईओ म्हणून सिंघल यांनी किंवा खातेप्रमुखांनीही कधी तपासले नाहीत. मुख्यालयातही हीच अवस्था असताना कधी लक्ष दिले नाही. शिक्षण सेवकांना सेवेत कायम करण्याची फाईल पाच महिन्यांनंतरही निकाली काढली नाही. शिक्षण सेवकांप्रमाणेच अन्य कामांच्या फायलींचेही असेच हाल सुरु ठेवले होते. अशा कारभाराला कंटाळलेल्या जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. अन्य पदाधिकारीही सीईओंच्या कामकाजाला कंटाळले होते. त्यांनीच सिंघल यांना रजेवर पाठवा व गुडेवार यांच्याकडे पदभार द्या, अशी मागणी केली होती. विभागीय आयुक्त, पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांनाही पदाधिकाऱ्यांनी सिंघल यांचा पदभार काढण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार गुरुवारी सिंघल यांची रजा मंजूर करुन गुडेवार यांना पदभार देण्याचे पत्र विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काढले. ते मिळताच लागलीच सिंघल यांनी गुडेवार यांच्याकडे पाच वाजता पदभार सोपविला. विभागीय आयुक्तांच्या आदेशात अतिरिक्त सीईओ हजर होईपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पदभार सांभाळावा, असे म्हटले आहे.
------------------
कामाच्या नियोजनाचे आव्हान...
जलसंधारण, पाणी अडविण्याच्या कामांचे नियोजन करावे लागणार
प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागणार
मुख्यालयातील विविध कार्यालयातील फायलींचा निपटारा होण्यासाठी तपासणी करावी लागणार
आरोग्य केंद्र बंद आहेत की सुरू?, हे पाहावे लागणार
मागील वर्षीचा अखर्चित व यावर्षीचा निधी खर्च होण्यासाठी तातडीने नियोजन, मंजुऱ्या व खरेदीचे आदेश द्यावे लागणार
ग्रामपंचायतींच्या कामाची पाहणी कोणीच करीत करीत नाही, ते करावे लागणार
शौचालय बांधण्याच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक
-------------------
खातेप्रमुखांची रात्री ९ वाजता बैठक...
गुडेवार यांनी यापूर्वी उस्मानाबाद, अमरावती, अकोला जि.प.ला काम केले असून उस्मानाबादला अतिरिक्त सीईओ असताना त्यांच्याकडे सीईओंचा पदभार होता. त्यांनी ठेकेदारी करणाऱ्या ९ जि.प. सदस्यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या गुडेवारांनी पदभार घेताच रात्री ९ वाजता जि.प.च्या खातेप्रमुखांची बैठक बोलावली. तुकाराम कासार व श्वेता सिंघल यांच्या कालावधीत जि.प.च्या ढेपाळलेल्या कारभाराला वेग देण्याचे काम गुडेवार यांना करावे लागणार आहे.