रिकाम्या बेंचसमोर उभारून सर जेव्हा शिकवितात; तेव्हा विद्यार्थी घरी मोबाईलसमोर मान हलवितात !
By Appasaheb.patil | Published: June 11, 2020 11:12 AM2020-06-11T11:12:23+5:302020-06-11T11:16:44+5:30
‘आॅनलाईन प्रणाली’ झपाट्यानं आत्मसात : ९० टक्के विद्यार्थ्यांचा खासगी क्लासेसच्या नव्या प्रयोगाला प्रतिसाद
सुजल पाटील
सोलापूर : शाळेचा परिसर...विद्यार्थ्यांचा गोंधळ.. तासातासाला वाजणारी घंटा.. विषयानुसार बदलणारे शिक्षक... दुपारची जेवणाची सुट्टी.. शाळा संपत येताच घरी जाण्याची गडबड, उत्कंठा़...या सर्वच गोष्टींना आता विद्यार्थी आठवू लागले आहेत़ त्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात सुरू झालेल्या आॅनलाइन शिक्षण प्रणालीमुळे़ रिकाम्या बेंचसमोर उभे राहून सर जेव्हा शिकवू लागतात तेव्हा घरी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या माना आपोआप हलू लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन काळात आणि नंतरही सोलापूरकरांकडून आॅनलाइन शिक्षण प्रणाली झपाट्यानं आत्मसात होत आहे. साधरण: ९० टक्के विद्यार्थ्यांचा खासगी क्लासेसच्यानव्या प्रयोगाला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
स्पर्धेच्या जगात ९० टक्के गुण म्हणजेच यश, हा बहुतेक पालकांचा समज असल्याने कोचिंग क्लासेस ही एक आता काळाची गरज बनली आहे. त्यात कित्येक मुलांचे आई-वडील दोघेही नोकरी करणारे असल्याने विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लासेस आवश्यकही असल्याचे सांगितले जाते. वह्या, पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण घेणारे विद्यार्थी आता मोबाईलवर व्हिडिओ पाहून शिक्षण पूर्ण करू लागल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खासगी क्लासेसधारकांनी आॅनलाईन शिकवण्या सुरू केल्या. या डिजिटल शिक्षण प्रणालीला सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी खासगी क्लासेसधारकांकडे अधिक आकर्षित होत आहेत.
अशी चालते आॅनलाईन क्लासेस प्रणाली...
- आॅनलाईन व्हिडिओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्रत्येक विषयाची ४० ते ५० मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करून ती व्हॉट्सअॅप, ई-मेल किंवा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार तो व्हिडिओ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर पाहून त्या-त्या विषयाचा अभ्यास घरी बसूनच करीत आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यास त्या विषयाबाबत अडचण असेल तर तो विद्यार्थी त्याच व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपली अडचण शेअर करतो. नंतर त्या अडचणींवर संबंधित प्राध्यापक त्या विद्यार्थ्याला त्वरित उत्तर देऊन त्या शंंकेचे निरसन करतात. यामुळेच आॅनलाईन शिकवणीला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत. आॅनलाईन शिकविलेल्या अभ्यासक्रमाचे नोट्स विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहेत. आॅनलाईन शिकवणीकरिता कलबुर्गी क्लासेस यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन एक वेगळे अॅप विकसित केले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या अन्य अडचणींबाबत शहरातील सर्वच खासगी क्लासेसधारक झूम अॅपद्वारे बैठका घेऊन पालक, विद्यार्थी व क्लासेसमधील प्राध्यापकवर्ग संवाद साधत असल्याची माहिती प्रा. शशिकांत कलबुर्गी यांनी दिली.
लाईव्हपेक्षा व्हिडिओ शिक्षण प्रणालीकडे ओढा
- सोलापुरात ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी शहरात येत असतात. ग्रामीण भागातील ९० टक्के पालकांकडे स्मार्ट फोन नाही. एखाद्या पालकाजवळ फोन असतो; मात्र नेटवर्क नसते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी आॅनलाईन शिक्षण प्रणालीचा उपयोग होत आहे. आम्ही कलबुर्गी क्लासेसकडून विद्यार्थ्यांसाठी खास अॅप विकसित केले आहे. अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तयार करून तो अॅपवर अपलोड आम्ही करतो, विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार तो व्हिडिओ पाहत आहेत.
- प्रा. शशिकांत कलबुर्गी,
कलबुर्गी क्लासेस
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तत्काळ आम्ही आमच्या क्लासेसतर्फे आॅनलाईन क्लासेसची प्रक्रिया राबवली. येत्या काही दिवसांत अॅप विकसित करणार आहोत. सध्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित आहोत.
-प्रा. सुशांत माळवे, लॉजिक अॅकॅडमी
शिक्षणात खंड पडू नये, यासाठी आॅनलाईन क्लासेसवर जास्तीचा भर दिला जात आहे. आम्ही आमच्या क्लासेसतर्फे प्रत्येक विषयाचा ६० मिनिटांचा व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सअॅपद्वारे शेअर करून विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यास सांगतो. या आॅनलाईन प्रणालीला सोलापुरात ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.
- रतन अगरवाल, जय अॅकॅडमी