सोलापुरातील पदपथांवर बसलेल्या गरजूंचे तीन दिवसांपासून जेवणाविना हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 01:50 PM2020-04-21T13:50:54+5:302020-04-21T13:52:36+5:30
सामाजिक संस्था, संघटनांचा उत्साह थंडावला; आशेने पाहताहेत कार्यकर्त्यांची वाट
सोलापूर : शहराच्या विविध ठिकाणी असणाºया गरजू व्यक्तींचे जेवणाविना हाल होत असल्याचे दिसत आहे. एकवेळच्या जेवणासाठी ते हताश मनाने सामाजिक कार्यकर्त्यांची वाट पाहत आहेत. जे मिळेल त्याची बचत करुन पुढच्या वेळची पोटाची खळगी भरत आहेत. सामाजिक संस्था, संघटना यांचा उत्साह थंडावल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप होत होते. अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने चारचाकी, दुचाकीवरुन कार्यकर्ते भात, भाजी, बिस्किटांचे वाटप करत होते. हा उत्साह आता थंडावल्याचे पाहायला मिळत आहे.
सुरुवातीच्या काळात गरजूंना इतके अन्न मिळायचे की ते आता बस असे म्हणायचे; मात्र जसजसा लॉकडाऊनचा काळ वाढत चालला तसे सामाजिक संस्था संघटनांचे अन्नवाटपाचे उपक्रम कमी झाले आहेत.
रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे ५० गरजू लोक उघड्यावर राहात आहेत. तसेच भिक्षुक, बेघर, कामगार हे स्टेशन परिसर, श्री सिद्धेश्वर मंदिर, एसटी स्टँड येथे थांबले आहेत. यातील काही लोक बेघर, काही कुष्ठरोग वसाहतीतील तर काही बाहेरगावातील आहेत. या सर्वांना अन्नासाठी सामाजिक संघटनांचा मदतीचा हात होता. आता हा हात आखडता झाला आहे. एखाद्या वेळेस कुणीतरी येतो आणि जेवण देतो. तो आला तर ठिक नाहीतर उपाशीच झोपणे त्यांच्या वाट्याला आले आहे.
सिव्हिलमधील धर्मशाळा बंद
- छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या देखभालीसाठी रुग्णाचे नातेवाईक येत असतात. या नातेवाईकांच्या राहण्याची सोय सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील धर्मशाळेत केली जाते. नाममात्र पैसे घेऊन येथे रुग्णाचे नातेवाईक मुक्काम करतात; मात्र १३ एप्रिल रोजी धर्मशाळेच्या गेटवर धर्मशाळा बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. ही धर्मशाळा बंद असल्याने अनेक गरजू नातेवाईकांच्या रात्री राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धर्मशाळा बंद असल्याने काही नातेवाईक हे रुग्णालयाच्या पायरीवर झोपत आहेत.
सुरुवातीचे १० ते १५ दिवस खूप देत होते. मी ते एकत्र करुन दुसºयांना देत होतो. मागील तीन ते चार दिवसांपासून जेवणाचे हाल होत आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते शिवभोजनाच्या माध्यमातून आपली भूक भागवत आहेत. तेही निर्धारित वेळेतच मिळते. एकदा मिळालेल्या जेवणातील भात खाऊन रात्री भाकरी किंवा पोळी राखून ठेवली जात आहे. ज्यांना जेवायला मिळत नाहीत ते उपाशी झोपत आहेत. एखादा व्यक्ती जवळून जात असला की त्याच्याकडे हे गरजू लोक आशेने पाहतात.
- एक गरजवंत