साडेसहा एकर उस जळून खाक ; सलग तिसऱ्या वर्षी एकाच ठिकाणी शॉर्टसर्किट
By दिपक दुपारगुडे | Published: October 22, 2023 06:21 PM2023-10-22T18:21:56+5:302023-10-22T18:22:10+5:30
दोन वर्षांपूर्वी येथेच सात शेतकऱ्यांचे वीस एकरांवरील उसाचे पीक जळाले होते.
सोलापूर : पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील बाळासाहेब मोरे यांचा ५ एकर व मारुती पाटील यांचा दीड एकर असा तब्बल साडेसहा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. हा प्रकार रविवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडला. या दोन्ही शेतकऱ्यांचे तब्बल १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पटवर्धन कुरोली-पेहे रस्त्यालगत बाळासाहेब मोरे यांचा पाच एकर व मारुती पाटील यांचा दीड एकर ऊस आहे. दुपारी २ वाजता शॉर्टसर्किटमुळे अचानक ही आग लागली. धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील नागरिकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. यात शेतकरी मोरे यांचा पाच एकर, तर पाटील यांचा दीड एकर ऊस जळाला.
दोन वर्षांपूर्वी येथेच सात शेतकऱ्यांचे वीस एकरांवरील उसाचे पीक जळाले होते. तर, गेल्या वर्षी विष्णू मोरे यांचा साडेतीन एकर ऊस जळाला होता. आता उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जाळून खाक झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.