कारवाईचा दम भरला अन् पंधरा दिवसात घेतली साडेसहा लाख सोलापूरकरांनी कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 12:18 PM2021-12-16T12:18:30+5:302021-12-16T12:18:37+5:30

नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरच्या पंधरवड्यात दुपटीने वाढ

Six and a half lakh Solapur residents took corona vaccine in 15 days | कारवाईचा दम भरला अन् पंधरा दिवसात घेतली साडेसहा लाख सोलापूरकरांनी कोरोना लस

कारवाईचा दम भरला अन् पंधरा दिवसात घेतली साडेसहा लाख सोलापूरकरांनी कोरोना लस

googlenewsNext

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने लस घेतलेल्यांनाच पेट्रोलसह अन्य साहित्य मिळणार असा फतवा काढण्याबरोबर लस न घेतलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारताच लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबरच्या पंधरवड्यातच नोव्हेंबरच्या तुलनेत लसीकरण दुपटीने वाढले आहे. विशेष म्हणजे, दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. पंधरा दिवसात तब्बल तीन लाख ८७ हजार २९२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

पेट्रोल पंप, रेशन दुकान, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेतू कार्यालय, शासकीय कार्यालये तसेच इतर ठिकाणी दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी लस घेतलेले नाही, ते स्वतःहून लसीकरण केंद्रावर जात आहेत. मागील पंधरा दिवसात सर्वच लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी होत आहे. सरासरी रोज पन्नास हजाराहून अधिक लसीकरण होत आहे. १५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान सरासरी २० ते २५ हजार लसीकरण होत होते. आता १ डिसेंबरपासून लसीकरणात दुप्पट वाढ झाली आहे सरासरी ५० ते ६० हजार लसीकरण रोज होत आहे.

आता सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. १८ ते ४५ वयोगटातील जवळपास साडे सात लाखांहून अधिक नागरिकांनी अद्याप पहिला डोसही घेतली नाही. या नागरिकांना लसीकरण केंद्राकडे आणण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर मोहीम राबवत आहे.

................

चौकट

सोलापूरकरांनो सावध व्हा..

ओमायक्रॉनचा रुग्ण लातूरमध्ये सापडल्यामुळे सोलापुरात सतर्कता बाळगली जात आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जात आहे. कर्नाटक आणि आंधातून येणाऱ्या प्रवाशांची सोलापूरच्या हद्दीवर तपासणी होत आहे. सोलापुरात पहिला डोस घेणाऱ्याचे प्रमाण ७८ टक्के असून दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ३८ टक्के आहे. ही आकडेवारी एकूण लोकसंख्येपैकी (१८ ते ४५ वयोगटातील) असून लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. ओमायक्रोनपासून वाचण्यासाठी सोलापूरकरांनो सर्वप्रथम लस घ्या आणि सुरक्षित रहा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मागील पंधरा दिवसातील लसीकरण

  • (पहिला व दुसरा डोस मिळून)
  • १ डिसेंबर : ३८,६५७
  • २ डिसेंबर : ३६,७४७
  • ३ डिसेंबर : ४७,३७०
  • ४ डिसेंबर : ५५,१५८
  • ५ डिसेंबर : ३८,३५०
  • ६ डिसेंबर : ७३,०५०
  • ७ डिसेंबर : ५१,२६३
  • ८ डिसेंबर : ६०,९३३
  • ९ डिसेंबर : ६१,१४२
  • १० डिसेंबर : ४५,०१७
  • ११ डिसेंबर : ५१,८६३
  • १२ डिसेंबर : ५४,६८०
  • १३ डिसेंबर : ४६०५७
  • १४ डिसेंबर : ४८,७२६
  • १५ डिसेंबर : २६, ७१४

 

Web Title: Six and a half lakh Solapur residents took corona vaccine in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.