विधानसभा निवडणूक तयारी; निवडणूक आयोगाकडून सोलापूर जिल्ह्यासाठी आले ३३०० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:07 PM2019-09-26T13:07:18+5:302019-09-26T13:10:25+5:30
सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून ३३०० उमेदवारी अर्ज आले आहेत. हे अर्ज विधानसभानिहाय वाटपासाठी गुरुवारपासून वितरित ...
सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून ३३०० उमेदवारी अर्ज आले आहेत. हे अर्ज विधानसभानिहाय वाटपासाठी गुरुवारपासून वितरित करण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे जवळपास २१५ प्रकारचे साहित्य येणार आहे. यामध्ये टाचणीपासून ईव्हीएम मशीन सील करण्याच्या साहित्याचा समावेश आहे. आता पहिल्या टप्प्यात दोन दिवसात पुणे व मुंबई येथून अकरा प्रकारचे दोन ट्रक स्टेशनरी साहित्य आले आहे.
जिल्हा पुरवठा कार्यालयावर साहित्य संकलन व वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी ४१ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी कारंडे व संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार जमदाडे यांच्यावर ही जबाबदारी आहे.
२७ सप्टेंबरपासून सर्व विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालयातून अर्ज विक्री व स्वीकृतीस सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभेसाठी ३०० प्रमाणे ३३०० उमेदवारी अर्ज पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांना प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे. १६५० प्रतिज्ञापत्राचे फॉर्म उपलब्ध झाले आहेत. उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्राचा नमुना मागेल त्यांना उपलब्ध करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या टप्प्यानुसार आयोगाकडून साहित्य पाठविले जाणार आहे.
सैन्यांसाठी पाठविणार अर्ज
- आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये असणाºयांना मतदान करता यावे यासाठी प्रॉक्सी वोटची सोय आयोगाकडून करण्यात आली आहे. प्रॉक्सी वोट म्हणजे सैनिकाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस मतदान करण्यास संमती देणे होय. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या सैनिकाच्या कार्यालयाकडे आयोगातर्फे पत्र पाठविले जाते. तेथील कार्यालयाने संबंधित सैन्याचे मतदार यादीतील नाव आॅनलाईन तपासून त्याचा दाखला सोबत जोडून त्या सैन्याचे संमतीपत्र भरून राहत्या पत्त्यावर पाठवून द्यायचे आहे. संबंधित सैन्याने ज्या व्यक्तीच्या नावे अधिकार दिला आहे, त्या व्यक्तीला सैन्याच्या नावे मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे.
चॅलेंज फॉर्मची सोय
- - मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर केंद्राधिकाºयांकडे १७ प्रकारचे अर्ज उपलब्ध केले जातात. यात बोगस मतदान झाल्याची तक्रार करणाºयास दोन रुपये शुल्क भरून चॅलेंज फॉर्म भरता येतो.
- - एखाद्या मतदान केंद्रावर आलेल्या व्यक्तीला आपल्या नावे आधीच कोणीतरी मतदान केले आहे असे निदर्शनाला आल्यावर त्याला मतदान केंद्राधिकाºयाकडे दोन रुपये शुल्क भरून चॅलेंज फॉर्म भरावा लागतो. त्यावेळी त्या मतदारास ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्यास परवानगी दिली जाते.
- - दावा करणारा जर बोगस मतदार असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई करण्याचा वेगळा फॉर्म भरला जातो.