सोलापूर शहराला सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:58 PM2018-07-28T12:58:11+5:302018-07-28T13:06:06+5:30
पाणीपुरवठ्याची हद्द झाली ; जलवाहिनी दुरुस्तीचे नियोजन ढेपाळले
सोलापूर : महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाºयांच्या बेफिकीरपणामुळे ४८ तासात उजनी जलवाहिनीवरील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन ढेपाळल्यामुळे शहरात पाच तर हद्दवाढ भागात सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमृत योजनेतून दीर्घकालीन पाणीपुरवठा सुधारणा करण्यासाठी उजनी जलवाहिनीवर आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी उजनी व पाकणी येथील पंप २५ जुलै रोजी रात्री १२ वाजता बंद करण्यात आले. त्यानंतर जलवाहिनी रिकामी करून २६ जुलै रोजी सकाळी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. सुरुवातीला दुरुस्तीच्या कामाचे नियोजन ४८ तासांसाठी करण्यात आले होते. त्या अनुषंगाने उजनी जलवाहिनी बंद राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे म्हणजे चार दिवसाआड तर हद्दवाढ भागातील पाच दिवसाआड करण्यात आला होता. जलवाहिनी दुरुस्तीनंतर ५ आॅगस्टपर्यंत हे नियोजन राहणार होते.
गुरुवारी जलवाहिनी दुरुस्तीची कामे अत्यंत संथगतीने करण्यात आली. सभागृहनेते संजय कोळी यांच्या पाहणीत दुरुस्ती कामाचा पर्दाफाश झाला होता. पण वितरण विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाºयांच्या नियोजनाप्रमाणे काम व्यवस्थित सुरू असल्याची माहिती दिली होती. पण आज शुक्रवारच्या पावसामुळे नियोजनाप्रमाणे काम झालेच नाही.
दुरुस्तीच्या जागेवरील दलदल व पावसाचे कारण पुढे करून महापालिकेच्या अधिकाºयांनी दुरुस्तीच्या वेळेचे नियोजन वाढविण्याचा निर्णय घेतला. दुरुस्तीचा वेळ वाढल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरात आता चारऐवजी पाच तर हद्दवाढ भागात पाचऐवजी सहा दिवसाआड पाणी येणार आहे.