दोन ब्रास वाळूसह सहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:04+5:302021-05-25T04:25:04+5:30
कटफळ दूरक्षेत्र हद्दीत अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी फौजदार संदेश नाळे, पोलीस पाटील, पोलीस नाईक हांगे, पोलीस ...
कटफळ दूरक्षेत्र हद्दीत अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी फौजदार संदेश नाळे, पोलीस पाटील, पोलीस नाईक हांगे, पोलीस माळी, चोरमुले, लक्ष्मण वाघमोडे हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते.
अचकदाणी ते कटफळ रोडवर बिगर नंबरचा ४०७ टेम्पो अवैधरीत्या वाळू भरून जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे हा टेम्पो पकडला असता अज्ञात चालक व एक अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या वेळी पोलिसांनी एक लाखाच्या टेम्पोसह आठ हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत पोलीस नागेश निंबाळकर, धनंजय आवताडे, शिंदे व होमगार्ड सुनील इंगोले असे वाढेगाव हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मेडशिंगी गावच्या शिवारातील वाळके वस्ती येथील कोरडा नदीपात्रात काही लोक ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत होते. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक सतीश दामोदर इंगवले (रा. मेडशिंगी) याच्याकडे रॉयल्टीच्या पावतीबाबत विचारणा केली असता त्याने पावती नसल्याचे सांगून या ट्रॅक्टरचा मालक शरद अभिमन्यू इंगवले (रा. मेडशिंगी) हा असल्याचे सांगितले.
या दरम्यान एक व्यक्ती पळून गेली. या वेळी पोलिसांनी पाच लाख रुपयांच्या ट्रॅक्टरसह आठ हजारांची एक ब्रास वाळू असा पाच लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक नागेश निंबाळकर व पोलीस लक्ष्मण वाघमोडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
-----