घेरडीत १४ जणांमध्ये झालेल्या भांडणात सहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:05+5:302021-08-24T04:27:05+5:30
फिर्यादी सुरेश पडुळकर यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी व त्याचा भाऊ विलास पडळकर यांची आठ ...
फिर्यादी सुरेश पडुळकर यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी व त्याचा भाऊ विलास पडळकर यांची आठ तोळ्यांची सोन्याची चेन असे १२ तोळे सोने कोणीतरी हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत सुरेश दादासाहेब पडळकर (रा. पारे) व दादासो भगवान करे (रा. घेरडी, ता. सांगोला) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.
पारे येथील सुरेश पडळकर हा आई रुक्मिणी व पत्नी मनीषा यांच्यासह कारमधून रक्षाबंधनासाठी बुरूंगलेवाडीकडे निघाला होता. दुपारी १.३०च्या सुमारास घेरडी-जवळा रोडवर दुचाकी उभी करून बापू करे व दादा करे हे बोलत थांबले होते. त्यावेळी सुरेश पडळकर यांनी कार थांबवून त्यांना बाजूला व्हा, असे म्हणाले असता त्यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर प्रकाश मोटे, नंदू बाळू पुकळे, अंकुश कुंडलिक मोटे, विलास माने, बिरा घुटुकडे, नाना खताळ यांनीही मारहाण केली. यावेळी सुरेशची आई व पत्नी भांडण सोडवत असताना त्यांनाही धक्काबुक्की केली. यावेळी पत्नी मनीषा हिने सुरेशचे भाऊ शरद व विलास यांना फोन करून बोलावून घेतले असता त्यांनाही काठीने मारहाण केली. या भांडणात सुरेश व विलास यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कोणीतरी काढून घेतले. यावेळी कारचे बॉनेट, आरशावर काठीने मारून नुकसान केले.
घेरडी येथील दादासो करे हा टमटमच्या टायरचे डिस्क बदलण्यासाठी थांबला होता. त्यावेळी एक स्विफ्ट गाडी थांबली. चालक सुरेश पडळकर याने गाडीचा हॉर्न वाजवत बापू करे यास तुझी दुचाकी बाजूला घे म्हणून शिवीगाळी करीत श्रीमुखात लगावल्या. तर दादासो करे यांनाही हाताने मारहाण केली. त्याच वेळी कारमधील मनीषा पडळकर व रुक्मिणी पडळकर या दोघींनी त्या दोघांना हाताने मारहाण केली. दरम्यान, दुपारी २ च्या सुमारास चुलत भावाचा मावस भाऊ बिराप्पा माने यांच्याशी बोलत थांबले होते. यावेळी बिराप्पा माने म्हणाला की, थोड्या वेळीपूर्वी भांडण झालेले हे लोक आपले पाहुणे आहेत. आपण आपापसात मिटवून घेऊ, असे म्हणत असताना पाठीमागून इनोव्हा गाडीतून आलेल्या शरद पडळकर, विलास पडळकर, अनिकेत गोरड यांनी नितीन रामचंद्र खताळ याच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. व इतर दोघे जण त्याला व त्याच्या भावास काठीने मारणार तेव्हा त्यांच्या काठ्या आम्ही धरल्या. त्यावेळी गावातील बिरुदेव पुकळे, सुभाष तळे, बापू काकेकर यांनी भांडणे सोडवासोडवी केली.