बाप रे....अतिवृष्टीच्या पुरात वाहून गेला अन् चार महिन्यांनी सांगाडा सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 01:21 PM2021-02-03T13:21:26+5:302021-02-03T13:22:32+5:30
तपासात निष्पन्न : बार्शीच्या बाजार समितीत तोलार म्हणून होता कामाला
बार्शी : अतिवृष्टीने जिल्ह्यात अनेकांना भोगावे लागले. गुरेढोरे वाहून गेली. मन्युष्यहानीही झाली. या नैसर्गिक हानीत कामावरून घराकडे निघालेला तरुण महापुराच्या लोंढ्यात वाहून गेला. आता चार महिन्यांतर त्याचा सांगाडा मंगळवारी सकाळी एका झाडास अडकून पडल्याचा पोलिसांना आढळून
आले. अजय उर्फ दादा चौधरी (वय- ४०, रा. बार्शी) असे या तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हा सांगाडा बार्शी- तुळजापूर रोडवरील अशोका हाॅटेलचे मालक महेंद्र सावळे यांना दिसला. त्यांनी मयताचे नातेवाईक किशोर चौधरी यांना फोनवरून कल्पना दिली. त्यानंतर मयताची पत्नी स्वाती,भाऊ किशोर चौधरी, सासू आशा चौधरी चुलत भाऊ कृष्णा चौधरी यांनी तेथे जाऊन पाहणी केली.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. पहाणी करताना दाट असलेल्या चिलरीच्या झाडास अडकलेला सांगाडा दिसला.
मयताच्या पत्नीने मानेच्या हाडांमध्ये गुंतलेला शर्ट पाहून ज्या दिवशी वाहून गेले त्या दिवशी तोच शर्ट त्यांच्या अंगावरही होता असे सांगितले. शिवाय या सांगाड्याची बांधणी पतीच्या शरीरयष्टीशी मिळतीजुळती असल्याने पत्नीने हा सांगाडा आपल्याच पतीचा असल्याचे सांगितले.
यातील मयत हा येथील बाजार समितीत तोलार म्हणून काम करत होता. १४ ऑक्टोबर २०२० रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तो काम संपवून फपालवाडी रोडवरील ओढ्यानजीकच्या राणा कॉलनीत असलेल्या घरी या ओढ्यातील पाण्यातून जात होता. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो जाताना पाण्यात पडून वाहून गेला. नाकातोंडात पाणी जाऊन मयत झाला. तपास न लागल्याने पोलिसांत तो वाहून गेल्याची नोंद झाली होती.
---------------
जागेवरच पंचनामा.. सांगाडा नातलगाच्या ताब्यात
- - या घटनेनंतर मयताच्या नातेवाइकास तहसीलदार यांनी भेटही दिलेली होती. परंतु अद्यापही शासनाची कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
- - मंगळवारी सांगाडा मिळताच शहर पोलीस नाईक श्रीमंत खराडे यांनी पंचनामा केला. जागेवरच वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शवविच्छेदन करून नातेवाइकाच्या ताब्यात दिले.
- - याबाबत ठाणे अंमलदार पोलीस नाईक दादासाहेब माने यांनी सीआरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय ज्ञानेश्वर उदार करत आहेत.