थप्पड..नियतीची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:50 PM2020-03-16T14:50:12+5:302020-03-16T14:50:18+5:30
त्या बाईने केलेल्या पापाबद्दल निश्चितच आज ना उद्या तिला परमेश्वर शिक्षा देणार.
गुरुजी आपल्या मुलीला आणि लहान नातीला घेऊन आॅफिसला आले होते. त्यांच्या जावयाने त्याच्या आॅफिसमधील एका बाईच्या नादाला लागून त्यांच्या मुलीला माहेरला हाकलून दिले होते. जावई बहिणीचा मुलगा म्हणजे त्यांचा भाचाच होता. बहिणीची गरिबी असल्याने गुरुजींनीच त्याचे शिक्षण केले होते. नंतर सरकारी नोकरीस लावले होते. स्वत:च्या मुलीचे त्याच्याबरोबर लग्न लावून दिले होते. त्यांच्या मुलीला वर्षाच्या आत एक मुलगी झाली. जावयाला मलाईदार खाते मिळाल्यामुळे वरकमाई खूप होती. वरकमाईच्या पैशामुळे त्याला मस्ती आली होती. आॅफिसमधीलच एका महिलेबरोबर त्याचे प्रेमप्रकरण सुरू झाले. त्या बाईला गुरुजींच्या जावयापासून एक मुलगीदेखील झाली. हे प्रकरण ज्यावेळी गुरुजींच्या मुलीच्या कानावर पडले, त्यावेळी मन:स्तापामुळे तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. त्या बाईच्या नादाला लागून त्याने बायकोला घरातून हाकलून दिले होते. तिला घेऊन गुरुजी आॅफिसला आले होते.
मी गुरुजींना म्हणालो, ‘बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेस रुल’ प्रमाणे जर सरकारी नोकराने विवाहबाह्य संबंध ठेवले तर त्याची नोकरीवरुन हकालपट्टी करता येते. आपण त्या दुसºया बाईच्या मुलीच्या जन्माचा दाखला मिळवून दोघांविरुद्ध तक्रार दाखल करु आणि त्या दोघांचीही नोकरी घालवू. दोघांची मस्ती उतरवू. गुरुजींची मुलगी म्हणाली- आबासाहेब, फक्त एवढेच करा, आम्हाला पोटगी मिळवून द्या आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी नवºयाकडून तरतूद करुन घ्या. त्या बाईने जरी माझा नवरा पळवून माझ्यावर अन्याय केला असला तरी मला तिच्यावर अन्याय करायचा नाही. आबासाहेब, त्या दुसºया बाईला पण लेकरु आहे. आपण जर तक्रार केली तर त्या बाईची नोकरी जाईल आणि त्या लेकरावरही अन्याय होईल. त्या निष्पाप लेकरावर कशाला अन्याय करायचा? मी तिला म्हणालो, मी तुला निश्चितच पोटगी व तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तुझ्या नवºयाकडून पैसे मिळवून देईन. पण लक्षात ठेव, त्या बाईने केलेल्या पापाबद्दल निश्चितच आज ना उद्या तिला परमेश्वर शिक्षा देणार.
आम्ही तिच्या नवºयाला व दुसºया बायकोला नोटीस दिली. नोटीस मिळाल्या- मिळाल्या ते दोघेही घाबरुन आॅफिसला आले आणि गयावया करु लागले. त्या नवºयाची मी चांगलीच कानउघाडणी केली. ज्या मामामुळे तुला शिकायला मिळाले, नोकरी मिळाली, त्या मामालाच तू दगा दिलास. बायकोला घराबाहेर काढलेस. तुमच्या दोघांची नोकरी घालवली असती. परंतु तुझी बायको इतक्या चांगल्या मनाची आहे की, तिची तुझी नोकरी घालवायची इच्छा नाही. फक्त तिला तुझ्याकडून दरमहा पोटगी आणि मुलीच्या लग्नासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवण्याची मागणी आहे. त्याने कपाळावरील घाम पुसला आणि म्हणाला, मी तयार आहे.
दुसºया दिवशी गुरुजी व त्यांच्या मुलीला बोलावून घेतले. त्यांच्या मागणीप्रमाणे पोटगी ठरवली. मुलीच्या लग्नासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले. गुरुजी मुलीला माहेरी घेऊन गेले. तिला नोकरीला लावले. तिने कष्ट करून मुलीला वाढवले. मुलगी चांगली शिकली. तिला चांगला नवराही मिळाला. लग्नाची पत्रिका मला आली होती. अत्यंत कलात्मक असलेली ती पत्रिका बहुतेक त्या गावातील आपल्या सोलापुरातील पोरे बंधूंसारख्या प्रतिभावंत कलाकाराने तयार केलेली असावी. लग्नपत्रिकेत तिने नवºयाचे नाव टाकले नव्हते. मी लग्नाला गेलो होतो. अत्यंत पवित्र वातावरणात लग्न पार पडले.
त्या नटव्या बाईच्या मुलीच्या लग्नाची देखील मला पत्रिका आली होती. त्या लग्नाला मी गेलो होतो. लग्नात संपत्तीचे बीभत्स प्रदर्शन दिसून येत होते. त्या नटवीच्या अंगावर किमान अर्धा किलोतरी सोने होते. लग्नातील सजावट, जेवण आणि आलेल्या असंख्य पाहुणे मंडळींवर होत असलेल्या खर्चावरुन लग्नात पदोपदी पैशाचा चुराडा होत असल्याचे ओंगळवाणे चित्र दिसत होते.
एका वर्षानंतर ती नटवी आणि तिचा नवरा लग्न झालेल्या मुलीसह आॅफिसला आले. ती बाई रडत सांगू लागली, जावयाने मुलीला हाकलून दिले. मी म्हणालो, का? ती म्हणाली, जावई आॅफिसमधील एका बाईच्या नादाला लागला आणि त्याने माझ्या मुलीला हाकलून दिले. वाचक हो! लक्षात ठेवा, नियतीची थप्पड फार जबरदस्त असते.
- अॅड. धनंजय माने
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)