‘बीबी का गुलाम’ बन गया ‘राजा’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:00 PM2019-06-17T16:00:39+5:302019-06-17T16:00:46+5:30

सकाळी-सकाळी तो आॅफिसला आला. तो रिक्षाचालक होता. त्याच्या चेहºयावरील क्रोध डोळ्यातून अंगाररुपाने प्रकट होत होता. तो सांगू लागला, वकीलसाहेब ...

'Slave of Bibi' became 'king'! |  ‘बीबी का गुलाम’ बन गया ‘राजा’! 

 ‘बीबी का गुलाम’ बन गया ‘राजा’! 

Next

सकाळी-सकाळी तो आॅफिसला आला. तो रिक्षाचालक होता. त्याच्या चेहºयावरील क्रोध डोळ्यातून अंगाररुपाने प्रकट होत होता. तो सांगू लागला, वकीलसाहेब बायको लई डांबरट आहे. पोरं बी तसलीच आहेत.  बायकोबद्दल सणसणीत शिवी हासडून तो म्हणाला, ताबडतोब मला सोडचिठ्ठी मिळवून द्या. रागाने तो थरथर कापत होता. त्यास पाणी दिले. दुसºया गप्पा मारल्या. तरीही तो दोन-चार मिनिटात पूर्वपदावर येत होता. सोडचिठ्ठी पाहिजे सोडचिठ्ठी पाहिजे, असे सारखे म्हणत होता. मी त्यास म्हणालो, सोडचिठ्ठी मिळणे खूप अवघड असते. तर तो रागाने म्हणाला मग तिला खलासच करतो व मी बी रेल्वेपुढे पडतो. 

प्रकरण खूपच गंभीर दिसले. तो सांगू लागला त्याचे लग्न झाले त्यावेळी त्याची बायको आठवी शिकलेली होती. लग्नानंतर तिने पुढे शिकायचा हट्ट केला. ती हुशारच होती. तिला शाळेत घातले. मॅट्रिकला चांगले मार्क मिळाले. तिला मास्तरीण व्हायचे होते. एकेदिवशी मला म्हणाली आपण सोडचिठ्ठी घेतली तर सोडचिठ्ठीवाल्या बाईला शिक्षक कोर्सला लगीच प्रवेश मिळतो. तिच्या इच्छेप्रमाणे सोडचिठ्ठीची कागदपत्रे केली. तिला कोर्सला प्रवेश मिळाला.  ती मास्तरीण झाली. तिला पगार सुरु झाला. मुले-बाळे झाली. 

ती नोकरीला जायची. मी घरी मुलांना सांभाळत बसायचो. सुखाचा संसार चालू होता. मुले मोठी झाली आणि तिचा पूर्वीचा चांगला स्वभाव बदलला. नोकरीने तिला लई अहंकारी बनवले.  माझी तिला लाज वाटू लागली. कोणत्याही समारंभाला ती मला नेत नसे, मुलांना नेत असे आणि मला टाळत असे. कारण मी पडलो रिक्षावाला. तिची जसजशी प्रगती होत गेली तसतशी घरात माझी किंमत कमी होत गेली. तिच्या शाळेतील शिक्षक-मैत्रिणी जर घरी येणार असल्या तर ती मला कोणतेतरी कारण काढून  मुद्दाम दोन-दोन तास बाहेर पाठवत होती. कारण तिला रिक्षावाल्या नवºयाची लाज वाटत असे. काल तर कहरच झाला. मुलासाठी मुलगी बघायला घरातील सर्वांना घेऊन परगावला गेली. मला घरीच ठेवले. साळसूदपणे म्हणाली, सध्या खूप चोºया होतात तुम्ही घरीच थांबा. 

दोन दिवसांनी लग्न ठरवूनच परत आली. मला काहीदेखील विचारले नाही. घरात मी गुलामगिरीचे जीवन जगतो वकीलसाहेब. असे अपमान करुन घेऊन जीवन जगण्यापेक्षा तिला खलास करुन रेल्वेपुढे उडी टाकून जीवच द्यावा असे वाटते. प्रकरण खूपच गंभीर होते. त्याला दिलासा देण्यासाठी मी म्हणालो तुम्ही काही काळजी करु नका. तुमच्या बायकोला नोटीस देऊन तिला चांगला शॉक देऊन सरळ करु. तिला तुमच्या पाया पडायलाच लावतो. त्याच्या समोरच कारकुनाला नोटिसीतील मजकूर सांगण्यास सुरु केले. 

नोटिसीत लिहिले की, घटस्फोटाचा खोटा बनाव करून कॉलेजला प्रवेश घेतला, त्याच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली, सरकारची फसवणूक केली, असा आरोप केला. त्याचप्रमाणे  तिला नोकरीत मिळालेल्या सर्व पगाराचा हिशोब केला. तो कित्येक लाखात होता. तो आकडा टाकून सरकारची फसवणूक करून सरकारचे एवढे पैसे लाटले व गंभीर गुन्हा केलेला आहे. त्या गुन्ह्याबद्दल तुम्हाला दहा वर्षांपर्यंत जेलमध्ये बसावे लागेल असा दम देखील दिला. नोटिसीतील प्रत्येक वाक्य ऐकताना त्याच्या चेहºयावरील क्रोध जाऊन तेथे आनंद फुलू लागला होता.  

ताबडतोब नोटीस पाठवली. तीन दिवसातच तो, त्याची ती अहंकारी बायको भेटायला आले.  ती बायको खूप नरमलेली व घाबरलेली होती. ती सारखी क्षमायाचना करत होती. मी तिची चांगलीच कानउघाडणी केली. नवºयाच्या त्यागावर तुमच्या कर्तृत्वाची इमारत उभी राहिलेली आहे, याची जाणीव करुन दिली.  तिची चूक तिला समजून आली. पुन्हा दोघांचा सुखाचा संसार सुरु झाला. 

वाचक हो लक्षात ठेवा पैसा व विद्या ही अनेकांचा चांगला स्वभाव बदलून टाकते. अहंकारी बनवते. सर्व संतांनी ईश्वराकडे एकच मागणं मागितलं आहे की ‘अहंकाराचा वारा ही मला लागू देऊ नकोस’. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावून उद्ध्वस्त करणारी वात आहे. अहंकाराची वात विझवण्याची कला ज्याला जमली तोच जीवनात खरा सुखी व समाधानी होतो हेच खरे. 

काही महिन्यानंतर त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी दोघे आले. रिक्षात नव्हे, कारमध्ये! त्याने अभिमानाने सांगितले हिने मला कार घेऊन दिली आहे. ती लाजून चूर झाली. गुलामाचे रुपांतर राजात झाले होते!  
-अ‍ॅड. धनंजय माने 
(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)

Web Title: 'Slave of Bibi' became 'king'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.