रोडच्या बाजूला झोपला; पोटावरुन वाहनाचं चाक गेलं; सुदैवानं बचावला, उपचार सुरू
By रवींद्र देशमुख | Published: September 7, 2023 06:38 PM2023-09-07T18:38:39+5:302023-09-07T18:39:01+5:30
सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या वेअर हाऊससमोर झोपलेल्या दोघांपैकी एका तरुणाच्या पोटावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
सोलापूर : सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या वेअर हाऊससमोर झोपलेल्या दोघांपैकी एका तरुणाच्या पोटावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. दुसऱ्याच्या दोन्ही कोपऱ्याला जखम झाली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या नंतर मुळेगाव तांडा येथील रामदेव वेअर हाऊच्या समोरील सर्व्हिस रोडवर घडली. प्रीतम रेवणसिद्ध माळी (वय- २३) असे पोटावरुन चाक गेलेल्या तरुणाचे तर भीमराव अर्जुन ढेंगळे (वय- ४५) असे दुसऱ्या जखमीचे नाव आहे.
यातील दोघे जखमी हे सोमवारी रात्री काम आटोपून मुळेगाव तांडा येथील रामदेव वेअर हाऊस समोर सर्व्हिस रोडच्या बाजूला झोपलेले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात वाहन वळवत असताना चालकाने मागच्या बाजूला कोणी आहे याची खबरदारी न घेता वाहन वळल्याने झोपलेल्या प्रीतम माळी याच्या अंगावरुन चाक गेले. यात त्याला गंभीर मुका मार लागला. त्याच्या बाजूलाच झोपलेल्या भीमराव याच्या दोन्ही हाताच्या कोपऱ्यांना खरचटले. या घटनेची माहिती मिळताच जखमी प्रीतमची आई लक्ष्मी हिने त्याला तर भीमराव याला मदतनिसामार्फत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही रुग्ण शुद्धीवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.