सोलापुरातील डिपार्टमेंट गार्डनमध्ये साकारतेय स्लायडिंग लायब्ररी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:12 PM2019-05-03T13:12:13+5:302019-05-03T13:14:39+5:30
स्मार्ट सिटीतील प्रकल्पातून होतेय साकार; स्पर्धा परीक्षा देणाºयांची होणार सोय
राजकुमार सारोळे
सोलापूर : महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यालयात साकारण्यात येणाºया डिपार्टमेंट गार्डनमध्ये स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय साकारण्यात येणार आहे. यासाठी या बागेत स्लायडिंग लायब्ररीची सोय करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून पासपोर्ट कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या उद्यान विभागात डिपार्टमेंट गार्डनचे नूतनीकरण पूर्ण करण्यात येत आहे. १0 मेपर्यंत बाग अत्याधुनिक लुकच्या स्वरूपात शहरातील बच्चे मंडळी, तरुणवर्ग आणि ज्येष्ठांच्या सोयीनीशी खुली होणार आहे.
विविध वैशिष्ट्य असलेली ही बाग सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. लहान मुलांसाठी बागेत अॅम्युजमेंट पार्क तयार करण्यात आले आहे. यात मुलांना साहसी खेळणी व जंगल जीवन लक्षवेधक ठरणार आहे. ज्येष्ठांसाठी कॉफी हाऊस उभारण्यात आले आहे. सिद्धेश्वर तलावाकाठी बेंचवर बसून कॉफीचा आस्वाद घेत गप्पा मारता येणार आहे. याचबरोबर फिरावयास आलेल्यांसाठी पेव्हर वॉकवेचा उपयोग होणार आहे.
आणखी एका वैशिष्ट्याने ही बाग लक्षवेधी ठरत आहे, ते म्हणजे स्लायडिंग लायब्ररी. यासाठी तयार करण्यात आलेला खास कक्षाचा दरवाजा सरकता आहे. यात ६ मुलांना बसून स्पर्धा पुस्तके वाचता येणार आहेत. या लायब्ररीत स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापेक्षा जास्त मुले अभ्यासासाठी आली तर त्यांना बागेतील बेंचचा उपयोग करता येणार आहे. या ग्रंथालयाची हाताळणी ज्येष्ठ नागरिकांच्या हाती सोपविण्याचा प्रस्ताव आहे. ही पुस्तके फक्त बागेतच हाताळता येणार आहेत. बागेला शुल्क आकारण्याचाही प्रस्ताव आहे.
काय आहे स्लायडिंग लायब्ररीची संकल्पना
या बागेत निव्वळ उनाडक्या करण्यासाठी येणाºयांना मज्जाव राहणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºयांना येथे वाव असणार आहे. त्यामुळे अभ्यासाला अडथळा होईल अशा गोष्टींना प्रतिबंध राहणार आहे. यावर सीसी कॅमेºयाची नजर राहणार आहे. मुलांच्या वेळेत हे ग्रंथालय बंद राहील. सहजपणे सरकणाºया दरवाजातून या लायब्ररीत प्रवेश मिळणार आहे. नोंद केल्याशिवाय पुस्तक मिळणार नाही.
उद्यान विभाग बागेचा विकास वेगळ्या पद्धतीने
- दोन एकराच्या या बागेत आधी महापालिकेच्या उद्यान विभागाचे कार्यालय, रोपवाटिका होती. हे कार्यालय पाडून दुसरीकडे हलविण्यात आले आहे. आता या ठिकाणी रोपवाटिका, रेन हॉर्वेस्टिंग मॉडेल, ई टॉयलेट, साऊंड सिस्टिम अशी व्यवस्था राहणार आहे.
दिवस ठरणार
- शहरातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ही बाग असणार आहे. त्यामुळे या बागेत कोणत्या दिवशी काय करता येईल याचे एक स्वतंत्र वेळापत्रक करण्याचा विचार आहे. सुटीदिवशी मुले जास्त येतात. त्यामुळे रविवारी अॅम्युजमेंट पार्क दिवसभर खुले ठेवावे लागणार आहे. स्लायडिंग लायब्ररी सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन सत्रात चालू राहील.