बिबट्यांना झुळूक माणुसकीची; सोलापुरातील प्राणिसंग्रहालयात पिंजºयापुढे लागले कुलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:40 AM2019-04-08T11:40:16+5:302019-04-08T11:43:20+5:30
वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर : महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात असलेल्या वन्यजीवांना सध्याच्या ४२ अंशांवर पोहोचलेल्या उष्मांकाच्या दिवसात माणुसकीची झुळूक अनुभवास येत आहे. वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे.
सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात चार बिबटे आहेत. त्यात नर आणि मादी प्रत्येकी दोन आहेत. २०१४ मध्ये त्यांच्यासाठी या बागेत मजबूत कठडे आणि पिंजरे उभारण्यात आले. या चारही पिंजºयांवर शहाळ्या टाकून छत तयार करण्यात आले आहे. सभोवती असलेल्या झाडांमुळे येथील तापमान बरेच कमी जाणवते. तरीही त्यांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये यासाठी चार वॉटर कुलर बसविण्यात आले आहेत. ते दिवसभर सुरू असतात. यासोबतच खुल्या आणि बंद पिंजºयांमध्ये पाईपने पाणी मारून वातावरणात गारवा राखण्याचा प्रयत्न केला जातो. या बिबट्यांच्या सेवेसाठी चार कर्मचारी तैनात असून, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आहार, आरोग्याची नियमित देखभाल केली जाते.
बलराम आहे नरभक्षक
- या उद्यानात असलेल्या चारही बिबट्यांपैकी ‘बलराम ’ नाव असलेला नरभक्षी आहे. यापूर्वी त्याने तीन जणांचा बळी घेतल्याची नोंद वनविभागाकडे असून, त्याला उत्तर प्रदेशातून पकडल्यानंतर येथील उद्यानात ठेवण्यात आले आहे. अन्य तीन बिबट्यांच्या तुलनेत आक्रमक आणि अधिक हिंस्र असलेला ‘बलराम’ पाच वर्षांचा आहे. त्याच्या बंदिस्त पिंजºयाजवळ जाताना उद्यानातील केअरटेकरलाही बरीच दक्षता घ्यावी लागते.
तिघे अखिलेशकुमार यादव यांच्याकडील बछडे
- बलरामव्यतिरिक्त तीन बिबटे येथे आहेत. त्यापैकी एकाचे नाव राजू ठेवण्यात आले असून, अन्य दोन माद्यांची नावे जिमी आणि हिना अशी आहेत. २०१४ मध्ये अखिलेशकुमार यादव यांच्या खासगी उद्यानातून त्यांना येथे वनविभागाने आणले. तेव्हा ते बछडे होते. आता विकसित झाले आहेत. हे तिघेही साडेचार वर्षांचे आहेत.
उद्यानातील चारही बिबट्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिंजºयांसमोर कुलर लावण्याचा निर्णय घेतला. त्यात नियमितपणे पाणी भरले जाते. पुढच्या तीव्र उन्हाच्या दोन महिन्यांत याचा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल. यासोबतच त्यांची नियमित वैद्यकीय तपासणीही केली जाते.
- डॉ. नितीन गोटे
संचालक, महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय, सोलापूर