तलावातील गाळ शेजारील खाणीत सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:20+5:302020-12-05T04:42:20+5:30
सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावातील गाळ काढण्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. माजी सैनिक नगरच्या पाठीमागील बाजूस (तलावाच्या ...
सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावातील गाळ काढण्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. माजी सैनिक नगरच्या पाठीमागील बाजूस (तलावाच्या उजवीकडे) असणाऱ्या खाणीत हा गाळ सोडण्यात येणार आहे.
तलावातील गाळ काढण्यासाठी तलावात बोट सोडण्यात आली आहे. या बोटीच्या माध्यमातून तलावातील गाळ पाईपद्वारे बाहेर काढण्यात येणार आहे. यासाठी तलावाच्या मुख्य भागातून पाईप हा खाणीजवळ आणण्यात येणार आहे. सध्या पाईप नेण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. गुरुवार तीन डिसेंबर रोजी ही पाईपलाईन पूर्ण होणार असून, चाचणी घेतल्यानंतर गाळ काढण्यास सुरुवात होईल.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अभियंता संजय धनशेट्टी, देवीदास मादगुंडी, सतीश वड्डेपल्ली यांनी तलाव व परिसराची पाहणी केल्यानंतर पाईप टाकण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. माजी सैनिक नगर परिसरातून पाईप नेताना रस्त्याचा अडथळा आल्याने तिथे माती टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील लोक या पाईपवर टाकलेल्या मातीच्या रस्त्यावरून ये-जा करत आहेत. खाणीचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी सांडपाणी असल्याने त्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
खाणीमध्ये टाकण्यात आलेल्या गाळाचा वापर हा खत म्हणून करण्यात येणार आहे. शेती आणि बागेसाठी हे खत वापरले जाईल. हा गाळ काही कालावधीसाठी खाणीत राहणार आहे. कामाचा एकूण कालावधी हा आठ महिन्यांचा आहे. सध्या दोन महिने झाले असून सहा महिने शिल्लक राहिले आहेत. मात्र, यापूर्वीच काम पूर्ण होईल असा विश्वास महापालिका अभियंता सतीश वड्डेपल्ली यांनी व्यक्त केला.
-------
गाळासोबत आलेले पाणी पुन्हा तलावात
माजी सैनिक नगर परिसरातील खाणीत सोडण्यात येणाऱ्या गाळासोबत पाणीही येणार आहे. हे पाणी कायमस्वरूपी खाणीत न ठेवता पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे. यासाठी पाण्याला रस्ता करून देणे किंवा त्यासाठी वेगळी पाईपलाईन उभारता येईल का, याबद्दल विचार सुरू आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होऊन काम पूर्ण होईल.
------
फोटो ः माजी सैनिक नगरच्या मागे बुधवारी धर्मवीर संभाजी तलावातून आलेली पाईपलाईन बसवताना कर्मचारी.
********