धक्कादायक! सोलापुरात जड वाहतूकीने घेतला चिमुकल्याचा बळी; दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 02:28 PM2023-01-27T14:28:10+5:302023-01-27T14:29:01+5:30
मागील महिन्याभरापासून शहरात जडवाहतूकीने बळी गेलेल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सोलापूर : शहरातील अशोक चौक परिसरात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास जड वाहतूकीने एका तीन वर्षीय मुलाचा जीव घेतला. भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकच्या चाकाखाली चिरडून मुलाचा मृत्यू झाला.
असद अल्ताफ बागवान (वय ३, रा. कर्जाळ, ता. अक्कलकोट) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस दलाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत मुलाचे शव शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुचाकी क्रमांक एमएच १३ बीएस ८३७७ या गाडीवरील दुचाकीस्वारास मालट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत गाडीवरील मुलगा खाली पडला अन् मालट्रकच्या चाकाखाली सापडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील अन्य दोघेजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
मागील महिन्याभरापासून शहरात जडवाहतूकीने बळी गेलेल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे जड वाहतूक करणारे मालट्रक बिनधास्त शहरात येतात त्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचेही सांगण्यात आले. जड वाहतूक अपघातात आतापर्यंत अनेक लहान मुलांचा जीव गेला आहे. शहरातील जड वाहतूकीला अनेक संघटना, संस्थांसह लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने सोलापूरकरांनी संताप व्यक्त केला आहे.