पुंडलिकाच्या पायथ्याशी सापडली चिमुकली, भीक मागून जगणारी तरुणी बनली माऊली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:21 PM2022-03-23T16:21:51+5:302022-03-23T16:23:55+5:30
छोट्या मुलीचे पालनपोषण न करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती नदी पात्रालगत चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिराजवळ तिला सोडून गेले
सोलापूर/पंढरपूर : ‘मुले ही देवाघरची फुले’ असे अनेक वेळा संबोधले जाते. मात्र, एक-दीड वर्षाची मुलगीच चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिराच्या पायथ्याशी ठेवून तिच्या कुटुंबातील सदस्यांनी पलायन केले. मात्र, नदी पात्राच्या बाजूला राहणार्या सोनाली थडके या भिक्षा मागून जगणार्या तरुणीच्या हाताला ती चिमुकली लागली. तिनेही दोन दिवस पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केली. ती तरुणी भिक्षा मागून जीवन जगत असली तरी त्या चिमुकलीसाठी तीन ड्रेस घेत मातृत्वाचं नातं जोडलं. दोन दिवसानंतर सोमवारी पोलिसांनी त्या बाळाला बालिकाश्रमाकडे सुपुर्द देताना त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
छोट्या मुलीचे पालनपोषण न करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती नदी पात्रालगत चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिराजवळ तिला सोडून गेले. ही मुलगी बेवारस अवस्थेत असून, रडत असल्याचे सोनाली थडके यांनी पाहिले. यावेळी महर्षी वाल्मीकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिच्या पालकांचा शोध सुरू केला. मात्र, त्या मुलीच्या पालकांचा शोध लागला नाही. यामुळे एक -दीड वर्ष वयाची, नाव, पत्ता माहीत नसलेल्या मुलीला अज्ञात स्त्री अथवा पुरुषाने सोडून गेल्याने शहर पोलीस ठाण्यात सोनाली थडके यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोहेकॉ कुंदन कांबळे करीत आहेत.
मुलीचा व्हिडिओ केला व्हायरल..
चंद्रभागा वाळवंटात एका दीड वर्षाच्या मुलीला कोणी कसे सोडून जाऊ शकते. त्यामागे फक्त ती मुलगी असण्याचे कारण असू शकते. त्या मुलीला वारसरदार असूनही ती बेवारस झाली आहे. तिला बेवारसपणे टाकून जाणाऱ्या आई-वडिलांवर कारवाई झाली पाहिजे. त्या मुलीची ओळख पटवून तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचता यावे यासाठी तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर गणेश अंकुशराव यांनी व्हायरल केला आहे.
कोट : चंद्रभागा नदी घाटावर मंदिर समितीचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहून मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नवरंगे बालिकाश्रमात तिला ठेवण्यात आले आहे.
- प्रशांत भागवत
निर्भया पथक प्रमुख, पंढरपूर
........
दोनच दिवसात मायलेकीचं नातं
चंद्रभागा नदीच्या घाटाच्या बाजूला राहणाऱ्या सोनाली संतोष थडके (वय २२, रा. महाद्वार घाट, पंढरपूर) यांना ती लहान मुलगी सापडली. सोनाली यांच्या पतीचे व मुलाचे निधन झाले आहे. यामुळे सोनाली या एकट्याच राहतात. पुंडलिक मंदिराजवळ मिळून आलेली मुलगी व त्यांच्यात एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. मिळून आल्यापासून ती लहान मुलगी सोनाली यांच्याकडेच होती. सोनाली यांनी त्या मुलीला स्वतःच्या मुलीप्रमाणे दोन दिवस सांभाळले. त्यांनी त्या छोट्या मुलीस दोन-तीन ड्रेसही विकत घेतले; परंतु त्या लहान मुलीची आरोग्य तपासणी करून कायदेशीर कारवाई करून नवरंगे बालिकाश्रमात त्या मुलीला ठेवण्यात आले. यावेळी सोनाली यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.