आधार कार्डामध्ये फेरफार करून मिळविले जातेय स्मार्ट कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:07 PM2019-07-02T16:07:53+5:302019-07-02T16:09:58+5:30
सोलापूर एसटी बसमध्ये सवलत मिळविण्यासाठी फसवणूक; दररोज पाठविले जातात २० बनावट कार्ड
रुपेश हेळवे
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्डाचे वाटप करण्यात येत आहे. पण हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून ‘स्मार्ट डोके’ लढवत आधार कार्डावर फेरफार करून ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचे स्मार्ट कार्ड काढण्याचा प्रयत्न होत आहे़ प्रत्येक दिवसात जवळपास २० ते ३० बनावट कार्डधारकांना कर्मचारी परत पाठवत आहेत़ सध्यातरी आधार कार्डावर फेरफार करणाºयांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटीचे राज्यभर स्मार्ट कार्ड वाटप करण्याचे काम सुरू आहे़ हे कार्ड ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र्यसैनिक, अंध-अपंग, विद्यार्थी, मासिक/त्रैमासिक पासधारक, पत्रकार आदींना देण्यात येत आहे़ ज्येष्ठ नागरिकांना ४ हजार किलोमीटरपर्यंत अर्ध्या तिकीट दरात प्रवास करता येणार आहे़ यामुळे याचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिक आधार कार्डवर जन्मतारखेत फेरफार करत ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती घेण्याचे प्रयत्न करत आहेत़ अशाप्रकारे फेरफार करणाºयांची संख्या वाढत असून दररोज जवळपास २० ते ३० नागरिकांना कर्मचारी परत पाठवत आहेत़ स्मार्ट कार्ड काढण्याच्या माध्यमातून छाननी प्रक्रिया सुरू आहे़ जर यामध्ये कोणी खोटी माहिती देत असेल तर त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार नाही़ पण अशाप्रकारे खोटे दस्तावेज दाखविणाºयांविरुद्ध कारवाई करण्याचे कोणतेही निर्देश अजूनपर्यंत आम्हाला प्राप्त नाहीत, असे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.
अशाप्रकारे होते फेरफार
- मूळ आधार कार्डावर जर जन्मतारीख ०१/०१/१९६८ असेल तर त्यात बदल करून अनेक नागरिक ०१/०६/१९५२ अशी तारीख असलेले बनावट कार्ड बनवून सादर करत आहेत़ अशा अनेक बाबी दररोज समोर येत आहेत.
अशाप्रकारे होते ओळखपत्रांची तपासणी
- स्मार्ट कार्ड देण्यासाठी एसटी महामंडळाकडून आधार कार्ड आणि मतदान कार्ड आणणे बंधनकारक असून आधार आणि मतदान ओळखपत्रातील माहिती तपासूनच स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे़