सोलापूरच्या स्मार्ट सिटीने दिली अपात्र कंपन्यांना कामे; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 04:58 PM2021-12-14T16:58:29+5:302021-12-14T16:58:33+5:30
वार्षिक सभा - महापाैर, विराेधी पक्षनेत्यांची मागणी, बैैठकीत झाला ठराव
साेलापूर -स्मार्ट सिटी कंपनीने निविदा प्रक्रियेतील निकषात न बसणाऱ्या मक्तेदारांना ३०० ते ४०० काेटी रुपयांची कामे दिल्याचा आक्षेप लेखापरीक्षकांनी नाेंदविला हाेता. तरीही या कंपन्यांना कामे देणारे अधिकारी आणि सल्लागार कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी महापाैर श्रीकांचना यन्नम, विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे यांनी साेमवारी केली. स्मार्ट सिटीच्या बैठकीत याबाबत ठरावही करण्यात आला.
साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी (स्मार्ट सिटी)च्या संचालक मंडळाची वार्षिक सभा साेमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी महापाैर श्रीकांचना यन्नम, पाेलीस आयुक्त हरिश बैजल, सभागृह नेता शिवानंद पाटील, विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, नगर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह कंपनीचे लेखापरीक्षक उपस्थित हाेते. विभागीय आयुक्त साैरभ राव व्हीसीव्दारे हजर हाेते. स्मार्ट सिटीचे चेअरमन असीम गुप्ता बैठकीला पुन्हा गैरहजर राहिल्याचे संचालकांनी सांगितले.
या सभेत स्मार्ट सिटी कंपनीचे लेखापरीक्षकांचे आक्षेप आणि कार्यवाहीबाबत चर्चा झाली. स्मार्ट सिटी कंपनीने २०१७ ते २०२० या कालावधीत ड्रेनेज लाइन, पाणी पुरवठा, रस्त्याच्या कामांसाठी ३००ते ४०० काेटी रुपयांच्या निविदा काढल्या. विजय इन्फ्रा, लक्ष्मी प्रा. लि., पाेचमपाड यासह इतर मक्तेदार कंपन्यांना कामे देण्यात आली. रस्ते व ड्रेनेज लाइनची कामे करणारे मक्तेदार निविदा प्रक्रियेतील निकषात बसतच नव्हते. तरीही सर्वात कमी दर दिल्याच्या नावाखाली या कंपन्यांना कंत्राटे दिल्याचा आक्षेप लेखापरीक्षकांनी नाेंदविला हाेता. मक्तेदारांची कामे पूर्ण झाली आहेत. बिलेही अदा केली आहेत. मात्र अपात्र लाेकांना कामे देणारे अधिकारी, सल्लागार कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे मत महापाैर यन्नम, अमाेल शिंदे यांनी नाेंदविले. आजच्या बैठकीत हा ठराव करा. यावर काय कार्यवाही झाली हे पुढील बैठकीत सांगा, असेही दाेघांनी सांगितले.
---
तज्ज्ञ संचालकांची मुदत संपली
स्मार्ट सिटीचे तज्ज्ञ संचालक नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील बैठकीला गैरहजर हाेते. या दाेघांचीही पाच वर्षांची मुदत संपली असून नव्या तज्ज्ञ संचालकांनी नियुक्ती हाेईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. नवे संचालक टक्केवारीपासून दूर राहणारेच असावे, असे शिंदे यांनी सांगितले.
--
समांतर जलवाहिनीचे रडगाणे कायम
साेेलापूरच्या पाणी प्रश्न दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीची काम ठप्प आहे. या कामासाठी नेमलेल्या मक्तेदाराला हटवण्यात आले आहे. नवा मक्तेदार नेमण्याची कार्यवाही अद्याप सुरू झाली नसल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले.