सो$ $ नू ....तुला वीज बील भरायचं नाय का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:21+5:302021-03-15T04:21:21+5:30
सोलापूर : सो$$$नू... तुला वीज बिल भरायचं नाही का ? सोनू आहे राज्याची शान शान ... सोनुला आहे गावात ...
सोलापूर : सो$$$नू... तुला वीज बिल भरायचं नाही का ? सोनू आहे राज्याची शान शान ... सोनुला आहे गावात मान मान ....सोनूचा मोबाईल भारी भारी... सोनूची गाडी पण भारी भारी.. सोनू आमचा ग्राहक लाडका लाडका...आम्ही त्याला वीज देतो बर का बरं का... सोनूची कॉलर लई टाइट टाईट... पण वीज बिल भरायला वाटते वाईट वाईट...सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का? अशा लाडिक शब्दात महावितरणने शेतकऱ्यांना साद घालत वीज बिल वसुलीची अफलातून मोहीम चालवली आहे.
वीज बिल भरण्यासाठीचे सगळे प्रयोग झाल्यानंतर आता महावितरणने नवी शक्कल लढवली आहे. ग्राहकाकडून वीज बिलाची वसुली करताना त्यांना न दुखविता अत्यंत लडिवाळपणे हाक दिली आहे. वीज ग्राहकांना सोनू नावाने हाक मारत, त्यांना गोंजारत, शाब्दिक कोट्यांनी कुरवाळत वीज बिल भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचा महावितरणचा हा नवा प्रयोग आहे. ग्रामीण भागातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अशी धून वाजवत ग्राहकांना साद घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव कर्मचारी व्यक्त करीत आहेत. सोनूचे महत्त्व विशद करताना त्याच्या कौतुकाची स्तुतिसुमने उधळत गाण्यातून सोनू कितीही मोठा असला तरी त्याच्या मोठेपणाला साजेशी सेवा वीज वितरण कंपनी पुरवत असते तरीही सोनूचे या सेवेकडे दुर्लक्षच होत आहे अशी ही धून असून सोनूच्या दैनंदिन जीवनात विजेचे मोठे महत्त्व आहे. त्याला वापरत असलेल्या विजेचे बिल भरण्याची लाज का वाटावी असा सवाल ही या गाण्यातून विचारण्यात आला आहे.
गेले चार दिवस दक्षिण सोलापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून महावितरणची गाडी गल्लोगल्ली सोनूचे गाणे वाजवत फिरत आहे. घरगुती वापराच्या वीज बिलासाठी ही गाण्याची धून असली तरी कृषी पंपाच्या थकबाकी बाबत शेतकरी वर्गाचेही चांगले प्रबोधन होत आहे . आपसात चर्चा करीत विजेचे महत्व आणि त्याचे बिल भरणे किती महत्त्वाचे याचीही चर्चा ता शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.त्याचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे.
-----